अंगणवाड्यांच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम : तातडीने नेमणूक करण्याची मागणी
बेळगाव : अंगणवाडी साहाय्यिका आणि मदतनीस यांची भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे अर्जदारांतून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र मागील चार महिन्यांपासून ही प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे संबंधितांचे प्रक्रियेकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात 5 हजार 300 अंगणवाडी केंद्रे आहेत. अलिकडे त्यामध्ये नवीन केंद्रांची भर पडली आहे. मात्र काही अंगणवाड्या साहाय्यिकांविना चालविल्या जात आहेत. तर काही अंगणवाड्यांमध्ये मदतनीसांची जबाबदारी साहाय्यिकांवर आहे. दरम्यान, अंगणवाडीतील रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र पुढील प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे रिक्त जागांवर साहाय्यिका आणि मदतनीसांची नेमणूक कधी करणार? असा प्रश्नही उपस्थित होवू लागला आहे. अंगणवाडी स्मार्ट करून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र अंगणवाडी साहाय्यिकाच नसल्याने बालकांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. शाळा स्मार्ट झाली. मात्र शिक्षिका नाही, असे चित्रही जिल्ह्यात काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. मात्र महिला व बाल कल्याण खात्याकडूनच रिक्त जागांवर भरती करण्यासाठी चालढकल सुरू असल्याचे दिसत आहे. उमेदवारांनी अर्ज करून चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप पुढील कार्यवाही थांबली आहे. त्यामुळे तातडीने रिक्त जागांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची नेमणूक करावी, अशी मागणीही पालकांतून होवू लागली आहे.
पुढील आठवड्यात उमेदवारांची यादी जाहीर करणार
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठवड्यात उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. नवीन नियमानुसार भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
– आर. नागराज-सहसंचालक महिला व बालकल्याण खाते









