इमारतीला गळती लागल्याने बालकांच्या जीविताला धोका : खानापूर सीडीपीओकडून पाहणी
वार्ताहर /जांबोटी
ओलमणी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक दोनची इमारत बालकांसाठी धोकादायक बनली असून इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अंगणवाडी इमारतीसाठी त्वरित निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे. ओलमणी गावासाठी दोन अंगणवाडी केंद्रे सुरू आहेत. दोन्ही अंगणवाडीसाठी दोन स्वतंत्र इमारतीचे बांधकाम केले आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी अंगणवाडी केंद्र क्रमांक दोनसाठी जिल्हा पंचायतमधून अंगणवाडी इमारतीसाठी निधी मंजूर झाला होता. या अंतर्गत हरिजन गल्लीनजीक असलेल्या जलानयन कार्यालयाच्या आवारात असलेल्या खुल्या जागेत अंगणवाडी इमारतीचे बांधकाम केले होते. मात्र कंत्राटदाराने अंगणवाडी बांधकामाचे बिल अदा केले नसल्यामुळे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडून दिल्यामुळे ग्रामपंचायतीने सदर इमारत अद्याप ताब्यात घेतली नाही. त्यामुळे अंगणवाडी बालकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून अंगणवाडी केंद्राचे कामकाज गेल्या कित्येक वर्षापासून जलानयन कार्यालयाच्या इमारतीतच सुरू आह.s मात्र सदर इमारतीच्या दुऊस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने जलानयन कार्यालयाची इमारतीची देखील दुर्दशा झाली असून छताला मोठ्याप्रमाणात गळती लागली आहे. तसेच खिडक्मयांची तावदाने फुटल्याने त्यातून तसेच भिंतीमधून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी पाझरत असल्यामुळे अंगणवाडीला सध्या डबक्मयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अंगणवाडीत एकूण 26 बालके शिक्षण घेतात. मात्र अंगणवाडीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे या अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांना पाण्यातच बसून शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे बालकांच्या आरोग्य व जीविताला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, नागरिकांनी महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर तालुका सीडीपीओ अधिकारी सुखाते यांनी या अंगणवाडी इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी अंगणवाडी केंद्र क्रमांक दोनचे त्वरित स्थलांतर करावे, असे आदेश संबंधित अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिकांना दिले आहेत.









