सैयाराच्या यशानंतर मिळाला नवा प्रोजेक्ट
अनीत पड्डाने अलिकडेच मोठ्या पडद्यावर ‘सैयारा’सारख्या सुपरहिट चित्रपटातून मुख्य नायिका म्हणून पदार्पण केले आहे. अनीत आता एका गंभीर भूमिकेत दिसून येणार आहे. सत्यघटनेने प्रेरित कोर्टरुम ड्रामामध्ये अनीत काम करणार आहे. या सीरिजचे नाव ‘न्याय’ असेल आणि ती ओटीटीवर प्रदर्शित केली जाणार आहे. ‘न्याय’मध्ये फातिमा सना शेख आणि अर्जुन माथुर हे कलाकारही मुख्य भूमिकेत असतील. ‘न्याय’ची कहाणी एका युवतीची असेल, जिचे प्रभावशाली धार्मिक नेत्याकडून लैंगिक शोषण केले जाते, याच्या विरोधात ती न्यायालयात लढा देते. या सीरिजमध्ये अनीत 17 वर्षीय पीडितेची भूमिका साकारत आहे. तर फातिमा ही संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. अर्जुन माथुर एका वकिलाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
‘न्याय’ या सीरिजचे दिग्दर्शन नित्या मेहरा आणि करण कपाडिया यांनी केले आहे. नित्याने यापूर्वी ‘बार-बार देखो’ यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सैयाराच्या यशानंतर अनीतचे चाहते तिच्या या नव्या प्रोजेक्टसाठी अत्यंत उत्सुक आहेत.









