आयसीसीकडून घोषणा
वृत्तसंस्था/ दुबई
आशिया स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता तर आहे. पण सामनाधिकाऱ्याची भूमिका कोण बजावणार याबाबतची चर्चा रंगली आहे. अशातच आशियाई क्रिकेट परिषदेकडून ही जबाबदारी पुन्हा एकदा सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तानच्या सामन्यांत खेळाडूंमध्ये तणाव कायम जाणवतोच, मात्र यावेळी तो आणखी असेल. कारण नुकत्याच झालेल्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता, आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या सामन्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने पायक्रॉफ्ट यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. पीसीबीने दावा केला होता की, पायक्रॉफ्ट यांनीच पाकिस्तानी खेळाडूंना भारतीयांशी हस्तांदोलन करू नका, असे सांगितले होते. यावरून त्यांनी पायक्रॉफ्टवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र आयसीसीने हा प्रस्ताव सरळ फेटाळून लावला. यानंतर
पायक्रॉफ्ट हे पाकिस्तान आणि युएई सामन्यात सामनाधिकारी होते. त्यामुळे पाकिस्तानने त्यांची हकालपट्टी करण्याची नाटकी सुरु केली होती. सामना खेळणार नाही अशी भूमिका घेतली होती. आयसीसीकडे विनंती केली होती की, त्यांना या स्पर्धेतून बाहेर काढा, पण आयसीसीने पाकिस्तानच्या मागणीला केराची टोपली दाखवली. दुसरीकडे, पाकने मीडियातून दावा केला गेला की, पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितली होती. त्यानंतर सामना सुरु झाला होता. पण पाकिस्तानचा हा दावाही खोटा निघाला होता. अर्थात, आयसीसी मात्र आपल्या रेफरीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. यामुळेच आज होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पायक्रॉफ्टच पुन्हा सामनाधिकारी असणार हे निश्चित झाले आहे.









