वृत्तसंस्था/ बेंगळूर
झिंबाब्वेचे माजी अनुभवी कर्णधार अँडी फ्लॉवरची 2024 च्या आयपीएल हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर घोषणा शुक्रवारी येथे आरसीबीच्या क्रिकेट संचालकांनी केली. यापूर्वी आरसीबीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी माईक हेसन आणि संजय बांगर यांच्यावर सोपवण्यात आली होती.
आरसीबीचे हेसन आणि बांगर यांच्याबरोबरच्या कराराचा कालावधी येत्या सप्टेंबरमध्ये संपणार होता. माईक हेसन आणि बांगर यांना आपल्या प्रशिक्षकपदाच्या करारासाठी मुदतवाढ मिळेल असे वाटत होते पण या संघाच्या फ्रान्चायजीनी अचानकपणे हेसन आणि बांगर यांची प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतल्याचे या संघाचे प्रमुख आणि उपाध्यक्ष राजेश मेनन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राजेश मेनन यांनी लंडनमध्ये अँडी फ्लॉवर यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत या नव्या पदाच्या कालावधी संदर्भातील अटी संदर्भात चर्चा केली. आरसीबीला अँडी फ्लॉवर हे अनुभवी प्रशिक्षक लाभत असल्याने पुढील वर्षीच्या आयपीएल हंगामात या संघाची कामगिरी निश्चितच दर्जेदार होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अँडी फ्लॉवर यापूर्वी लखनौ सुपरजायंट्सचे गेल्या दोन आयपीएल हंगामासाठी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाला अँडी फ्लॉवर यांचे मार्गदर्शन मिळत असल्याने या संघाचा दर्जा निश्चितच वाढला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाबरोबर तब्बल 12 वर्षे अँडी फ्लॉवर यांचा संबंध होता. 2007 साली इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने अँडी फ्लॉवरची इंग्लंड क्रिकेट संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी इंग्लंड संघाला पीटर मुर्स हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभले होते. दरम्यान 2014 साली अँडी फ्लॉवर यांच्याकडे इंग्लंड संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाची सूत्रे बहाल करण्यात आली. फ्लॉवर यांचा प्रशिक्षकपदाच्या कालावधीत इंग्लंड संघाने 2010 साली आयसीसीसची टी -20 विश्वचषक स्पर्धा तसेच 2010-11 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅशेस मालिका जिंकली होती. त्याचप्रमाणे कसोटी मानांकनात इंग्लंडने अग्रस्थानही पटकावले होते. अँडी फ्लॉवरला आयपीएलचा चांगलाच अनुभव असून त्यांनी यापूर्वी लखनौ सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले होते. आरसीबीच्या महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाची बदली करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या बेन सॉयर हे प्रमुख प्रशिक्षक असून त्यांच्या करारामध्ये वाढ करण्याची शक्यता असल्याचे समजते.









