वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या लोबरो आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत आंध्रप्रदेशची महिला धावपटू ज्योती यर्राजीने महिलांच्या 100 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. गेल्या दोन आठवडय़ाच्या कालावधीत ज्योतीने या क्रीडाप्रकारात दुसऱयांदा राष्ट्रीय विक्रम केला आहे.
महिलांच्या 100 मी. अडथळा शर्यतीत रविवारी 22 वर्षीय ज्योतीने 13.11 सेकंदाचा अवधी घेतला. 10 मे रोजी सायप्रसमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत ज्योतीने 13.23 सेकंदाचा अवधी घेत राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. भुवनेश्वरच्या ऍथलेटिक्स केंद्रामध्ये ज्योतीला जेम्स हिलेर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ज्योतीने यापूर्वी नोंदविलेल्या 13.23 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम ब्रिटनमधील झालेल्या स्पर्धेत मागे टाकला. या क्रीडाप्रकारात 2002 साली अनुराधा बिस्वालने 13.38 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. पुरूषांच्या 110 मी. अडथळा शर्यतीमध्ये आसामच्या 24 वर्षीय टी. सिद्धांतने 13.97 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर तामीळनाडूच्या ग्रेसन अमलदासने कनिष्ठ पुरूषांच्या गटातील 110 मी. अडथळय़ाची शर्यत जिंकताना 13.91 सेकंदाचा अवधी घेतला.









