वृत्तसंस्था/ कॅनबरा
आंध्रप्रदेशचा 27 वर्षीय विद्यार्थी साई रोहित पलाडुगु यांचा ऑस्ट्रेलियातील क्हिक्टोरियामध्ये कार झाडाला आदळल्याने मृत्यू झाला आहे. चित्तूर जिल्हय़ातील पोलकला येलमपल्ली गावचा रहिवासी असलेला पलाडुगु 2017 मध्ये शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात गेला होता.
चालकाने नियंत्रण गमावल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळली असावी असे क्हिक्टोरिया पोलिसांचे मानणे आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पलाडुगु स्वतःच्या आईला आर्थिक स्वरुपात मदत करण्यासाठी आणि शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी काम देखील करत होता. त्याच्या वडिलांचे निधन झालेले असल्याने घरात तो एकटाच कमावता होता. पलाडुगुच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील तेलगू भाषिकांच्या संघटनेने 65 हजार डॉलर्सहून अधिक निधी जमविला आहे.









