वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. अँडरसन रविवारी 41 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. इंग्लंडतर्फे सर्वाधिक बळी मिळवणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तुर्ताला निवृत्तीचा निर्णय घेणार नसल्याचे अँडरसनने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत अँडरसनची गोलंदाजी म्हणावी तशी प्रभावी झालेली नाही. आतापर्यंत त्याने या मालिकेत केवळ 5 गडी बाद केले आहेत. अद्याप माझ्याकडून क्रिकेटला बरेच काही द्यावयाचे आहे, असे त्याने सांगितले. शुक्रवारी अॅशेस मालिकेतील सुरु असलेल्या शेवटच्या कसोटीतील खेळाच्या दुसऱ्या दिवसानंतर बीबीसी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. अद्याप मी अचूक आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतो याची मला जाणीव आहे. ज्यावेळी माझ्याकडून खराब गोलंदाजीचे प्रदर्शन होई&ल त्यावेळी मी निवृत्तीचा निश्चितच विचार करेन असेही तो म्हणाले.
ऑस्ट्रेलियाबरोबर सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत त्याने आतापर्यंत पाच गडी बाद केले आहेत. उभय संघातील सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत शुक्रवारी त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शला बाद केले होते. अॅशेस कसोटी मालिकेच्या इतिहासामध्ये इंग्लंडच्या गोलंदाजीला नव्या चेंडूवर प्रारंभ करणारा अँडरसन हा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू आहे. यापूर्वी म्हणजे 1925 साली इंग्लंडच्या जॉनी डग्लसने हा बहुमान मिळवला होता. अॅशेस मालिकेतील हेडिंग्लेच्या कसोटीत अँडरसनचा सहभाग नव्हता. दरम्यान त्याने या मालिकेत एजबेस्टनच्या कसोटीत एक गडी तर लॉर्डस्च्या कसोटीत दोन गडी बाद केले होते. अॅशेस मालिका संपल्यानंतर अँडरसनला येत्या जानेवारीत भारतामध्ये होणाऱ्या मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकेल.









