दापोली :
ज्येष्ठ साहित्यिक व अरण्यऋषी म्हणून परिचित असणारे मारुती चितमपल्ली यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. चितमपल्ली यांनी आपल्या दापोलीतील वास्तव्यात नामशेष झालेल्या समुद्री विंचवाची एक प्रजाती प्रकाशात आणली होती. त्यांना पद्मश्री मिळाल्याने या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. दापोलीत ऋषीवत जीवन जगणाऱ्या मारुती चितमपल्ली यांच्या सन्मानामुळे दापोलीवासियांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
- वनाधिकारी म्हणून ३६ वर्षे सेवा
वनाधिकारी म्हणून शासकीय सेवेत असल्याने चितमपल्ली यांना वनांचा सहवास लाभला. वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी केल्यानंतर १९९० साली ते सेवानिवृत्त झाले. नोकरी दरम्यान आणि त्यानंतरही एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली यांनी जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत केले.








