मंडणगड :
पूर्ण देशास हादरवणाऱ्या अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या अपघातात मृत्यू पावलेली एअर इंडियाची २७ वर्षीय एअर क्रू मेंबर रोशनी राजेंद्र सोनघरे डोंबिवलीमध्ये वास्तव्यास असली तरी मूळची मंडणगड तालुक्यातील बुरी गावची. आपल्याला हव्या त्या क्षेत्रात काम करायला मिळाल्यामुळे नेहमी खूष राहणाऱ्या रोशनीने त्याच आनंदात लंडनला जाताना घरच्यांना दिलेला निरोप दुर्दैवाने अखेरचा ठरला. अपार कष्टाने आपले ध्येय साध्य करणारी रोशनी तालुकावासियांसाठी ‘रोल मॉडेल’ असल्याने तिच्या अकाली जाण्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
रोशनी लंडन येथे जाण्यासाठी बुधवारी आई-वडिलांचा निरोप घेऊन निघाली ती शेवटची. रोशनीचे कुटुंब सथ्या डोंबीवली पूर्व येथील उमिया इमारतीत राहत होते. आई राजेश्री, वडील राजेंद्र, भाऊ विघ्नेश यांच्यासमवेत डोंबीवली येथे ती वास्तव्यास होती. हवाई सुंदरी होण्याचा ध्यास तिने लहानपणापासून घेतलेला होता. मुंबईतील सरस्वती इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने भारत कॉलेजमधून उच्च शिक्षण पूर्ण केले.
- २०२४ मध्ये ‘एअर इंडिया’त रुजू
उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने अंधेरी संस्थेतून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. २०२१ मध्ये ती स्पाईस जेटमध्ये नोकरीला लागली. तेथे २ वर्षे सेवा केल्यावर २०२४ मध्ये एअर इंडियामध्ये रुजू झाली होती. आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने रोशनी नेहमी आनंदी असायची. मात्र दुर्दैवी विमान अपघाताने तिचा व तिच्या कुटुंबियांचा आनंद कायमचा हिरावून घेतला. लंडनला जाण्याच्या आनंदात तिने घरच्यांना दिलेला ठरला.
- वडिलांनी नेहमीच दिले प्रोत्साहन
अपघाताची बातमी कळताच मर्चेंट नेव्हीत असलेला भाऊ व वडील तातडीने अहमदाबादला रवाना झाले. अपघाताच्या धक्क्यातून तिची आई अद्याप सावरलेली नाही. आपली मुलगी सुरक्षित परत येईल, अशी आशा तिला वाटत आहे. सोनघरे कुटुंब सुरुवातीला मुंबईतील ग्रँड रोड परिसरात राहत असे. दोन वर्षांपूर्वी हे कुटुंब डोंबिवलीत स्थायिक झाले. वडील टेक्निशियन असून पडेल ते काम करत असले तरी दोन्ही मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देत आले आहेत.
- गावाशी घट्ट नाळ
सोनघरे कुटुंब मुंबईत वास्तव्यास असले तरी गावाशी त्यांचे नाते आजही घट्ट आहे. बुरी येथे त्यांचे घर असून गावात सोनघरे कुटुंब मोठे आहे. गावातील सर्व सण व महत्वाच्या कार्यक्रमांना कुटुंबाची हजेरी असते. प्रचलित काळात मोठ्या पदावर पोहचून काम करणारी रोशनी तालुकावासियांसाठी ‘रोल मॉडेल’ होती.
- ५४ हजाराहून अधिक ‘फॉलोअर्स’
मेहनत, कर्तृत्व, जिद्द यांच्या आधारे स्वप्नांला गवसणी घालून कुटुंब, गाव व तालुक्याचे नाव उज्ज्वल करणारी रोशनी तिच्या मनमिळावू स्वभावामुळे प्रत्येकाच्या मनात घर करून होती. हवाई सुंदरी म्हणून काम करण्याबरोबर रोशनी डिजीटल समाज माध्यमात विशेष प्रसिद्ध होती. इन्स्ट्राग्रामवर रोशनीचे ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. एक ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर म्हणून तिने चांगले नाव कमावले होते.








