सातारा :
वेळ सायंकाळी साडे चारची. ठिकाण बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखालील चौक, पावसाची रिपरिप सुरुच. त्या पावसातही वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त होते. अचानक वाहनांची गर्दी झाली. त्याच गर्दीत एक रुग्णवाहिका सातारा शहरातून सायरन वाजवत निघाली होती. परंतु अचानक वाहतूक कोंडी फोडून रुग्णवाहिकेला मोकळा रस्ता करुन देण्याचे दिव्य काही वेळाच वाहतूक शाखेचे एपीआय अभिजित यादव यांच्या टीमने करुन दिल्याने सातारकरांनी त्यांचे आभार मानले. सातारा शहर वाहतूक शाखेच्या जवानांची तत्परता पहायला मिळाली.
सातारा शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सातारा शहर वाहतूक शाखेचे एपीआय अभिजित यादव हे व त्यांची टीम सदैव तयार असते. त्याचाच प्रत्यय सातारकरांना वारंवार येतो. सोमवारीही सकाळपासून सातारा शहरात पावसाच्या सरीवर सरी सुरु होत्या. त्याच पावसात सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली वाहतूक कोंडी अचानक वाहनांची संख्या जास्त झाल्याने निर्माण झाली होती. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तेथील कर्तव्यावर असलेले वाहतूक कर्मचारी कार्यरत होते. त्याच दरम्यान, सातारा शहरातून एक रुग्णवाहिका सायरन वाजवत आली. गर्दीतून वाहन पुढे जायला सुद्धा जागा नव्हती. परंतु वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णवाहिकेला रस्ता करुन दिला. वाहतूक शाखेचे एपीआय अभिजित यादव यांच्या टीमने केलेल्या सत्कार्याची साताऱ्यात चर्चा सुरु होती. त्यांनी वाहतुकीची कोंडी फोडून वाहतुक सुरळीत करुन रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले जात आहे.








