पतीनंतर मुलाचाही अपघाती मृत्यू ; शिवदत्तच्या मृत्यूने वास्कोत हळहळ
वास्को : काही वर्षांपूर्वी रस्ता अपघातात शिवदत्त नाईक याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आता शिवदत्तचाही अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या आजारी मातेचा आधार गेला आहे. मुलाच्या भविष्याची स्वप्ने पाहिलेल्या या मातेवर संकट कोसळले आहे. सांगे तालुक्यातील नेत्रावळी गावातील मैनापी धबधब्यावर रविवारी आपल्या मित्रांसह निसर्गाचा आनंद लुटताना पाय घसरून पाण्यात पडलेला वाडे, वास्को येथील शिवदत्त नाईक शेवटी पाण्याच्या प्रवाहात गायब झाला. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला. मूळ होडार कुडचडे येथील शिवदत्त नाईक याचे कुटुंब वडिलांच्या नोकरीनिमित्त वास्कोत वास्तव्यास होते. एमपीटी कॉलनी सडा, त्यानंतर बायणा भागात काही वर्षे राहिल्यानंतर वर्षभरापूर्वीच हे कुटुंब मेर्सिस वाडे वास्को भागात एका फ्लॅटमध्ये राहायला आले होते. काही वर्षांपूर्वी मयत शिवदत्त यांच्या वडिलांना झुआरीनगरातील महामार्गावर अपघाती मृत्यू आला होता. त्यामुळे आई, भाऊ व बहीण या तिघांवर संकट कोसळले होते. शिवदत्तच्या बहिणीचे लग्न झाले आहे. त्यामुळे शिवदत्त हाच त्याच्या आईला एकमेव आधार होता. शिवदत्तने बारावीनंतर अभियांत्रिकी शिक्षण घेतले होते. वास्कोतील एका खासगी आस्थापनासाठी तो काम करीत होता. आई आजाराने ग्रस्त असल्याने त्याला आईची चिंता होती. मात्र, वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर शिवदत्तलाही काळाने अपघाती हिसकावून नेल्याने आता आजारी आईचा एकमेव आधार गेला आहे, पतीनंतर तिच्यावर हे दुसरे संकट कोसळले आहे.









