जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘त्या’ घटनेची दखल
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी गोंधळ घातल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आवारामध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या घटनेची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या समस्या घेऊन दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आवारामध्ये कोणताच गोंधळ होऊ नये, यासाठी नेहमीच पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. सोमवारी बेकिनकेरे येथील काही नागरिक आपल्या समस्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कक्षाकडे प्रवेश करून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी निवेदन देताना महिलांनी रडारड केल्याने कार्यालयात एकच गोंधळ उडाला. यामुळे जिल्हाधिकारीही अचंबित झाले. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यामुळे जागे झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवार दि. 4 रोजी अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य प्रवेशद्वारासह मागील प्रवेशद्वाराच्या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त ठेवून खबरदारी घेतली. प्रवेशद्वारामध्ये वाढलेला पोलीस बंदोबस्त पाहून याविषयाची चर्चा रंगली होती. सोमवारच्या घटनेमुळे मार्केट पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी करावी लागली.









