सुपर-4 फेरीत अफगाण-पाक समर्थकातील झटापटीचे पडसाद!
काबूल-अफगाणिस्तान / वृत्तसंस्था
सध्या प्रचंड आर्थिक अरिष्टातून मार्गोत्क्रमण करत असलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आशिया चषक स्पर्धेचे सहाव्यांदा विजेतेपद संपादन केल्यानंतर अगदी अफगाणिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांनी थेट रस्त्यावर उतरत या विजयाचा आनंद साजरा केला!
अलीकडेच अफगाण-पाकिस्तानचे संघ सुपर-4 फेरीत आमनेसामने भिडले, त्यावेळी दोन्ही संघांच्या समर्थकात प्रचंड हाणामारी झाली. शिवाय, परस्परांनी खुर्च्याही एकमेकांवर फेकल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, अफगाणी चाहत्यांनी रस्त्यावर उतरत साजरा केलेला आनंद सोशल मीडियात चर्चेत राहिला.
भानुका राजपक्षचे दमदार अर्धशतक आणि वणिंदू हसरंगा, प्रमोद मदुशन यांच्या भेदक माऱयाच्या बळावर श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला.
अफगाणी पत्रकार अब्दुलहक ओमेरीने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये अफगाणमध्ये चाहते रस्त्यावर उतरत लंकेच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला असल्याचे दिसून आले. लंकेने पाकिस्तानला नमवल्याने अफगाणचे काही चाहते विजयाच्या घोषणा देत यात सामील झाले.
चाहत्यांनी अगदी सोशल मीडियावर देखील आपल्या भावनांना वाट करुन दिली. शिवाय, फायनलमध्ये पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवरुन, विशेषतः क्षेत्ररक्षणातील चुकांवरुन त्यांना ट्रोल देखील केले. ‘आम्हाला आनंद मिळवून दिल्याबद्दल लंकन संघाचे आभार. अफगाण लंकेच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे’, असे एका युजरने ट्वीट केले.
यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत अफगाणने अव्वल प्रदर्शन साकारले. त्यांनी साखळी फेरीत श्रीलंका, बांगलादेश यांच्याविरुद्ध दमदार विजय मिळवले. मात्र, सुपर-4 फेरीत त्यांना श्रीलंका, पाकिस्तान व भारत या तिन्ही संघांविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.









