तुर्कियेत लागला शोध
जगातील सर्वात विकसित प्राचीन भूमिगत शहराचा शोध लागला आहे. या शहरात मॉडर्न स्टोव्ह आणि अनेक तळघरं आहेत. तुर्कियेच्या पुरातत्वतज्ञांनी या शहराचा शोध लावला आहे. या शहराचा वापर रोमन साम्राज्यादरम्यान एका सेंचुरीच्या (संरक्षित जागा) स्वरुपात केला जात होता असे मानले जातेय. या भूमिगत शहराच्या उत्खनतात अनेक गोष्टी सापडल्या असून त्या पाहून जाणकार थक्क झाले आहेत.
सरायिनी नावाचे शहर 2 लाख 15 हजार चौरस फुटांमध्ये फैलावलेले आहे. यात मोठ्या संख्येत भूमिगत खोल्या आणि मोकळी जागा आढळून आली आहे. हे ठिकाण तुर्कियेच्या कोन्या येथील सरायोनू जिल्ह्यात आहे. या भूमिगत शहरात एकूण 30 खोल्या आहेत. आठव्या शतकादरम्यान हे शहर 20 हजार लोकांसाठी आश्रयस्थान राहिले असेल, रोमन सैनिकांपासून लपवण्यासाठी हे सुरक्षित ठिकाण निर्माण केले असावे असे मानले जात आहे.
भूमिगत शहरात अनेक चकित करणाऱ्या गोष्टी मिळाल्या आहेत. प्राचीन शहरात स्टोव, चिमणी, भांडारगृह, लॅम्पस्टँड, तळघर, व्हेंटिलेशन सिस्टीम आणि विहिरी देखील आढळून आल्या आहेत. पुरातत्व तज्ञांना एक रुंद मार्ग देखील दिसून आला असून तो येथील मुख्य मार्ग असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.
सरायिनी नाव का?
कोन्या संग्रहालयाचे पुरातत्व तज्ञ हसन उगुज यांनी हे शहर इतक्या मोठ्या क्षेत्रात फैलावलेले असेल अशी कल्पनाच केली नव्हती असे म्हटले आहे. सिराय आतून आरामदायी, परस्परांशी जोडले गेलेले आणि वास्तुशिल्प डिझाइनमुळे एका महालासारखे दिसते. यामुळे याला सरायिनी म्हटले जावे असा निष्कर्ष आम्ही काढला आहे. सरायिनीचा तुर्क भाषेतील अर्थ महाल असा होतो असे त्यांनी सांगितले.
कसा लागला शोध?
2 वर्षांपासून सरायिनी स्थळी उत्खनन होत आहे. परंतु विशाल आकारामुळे याचा पूर्णपणे शोध लागलेला नाही. सर्वप्रथम या भूमिगत शहराविषयी एका तुर्क व्यक्तीला कळले होते, तो पाळीव प्राण्यांच्या मागून चालत असताना भूमिगत शहरात कोसळला होता. यानंतर त्याने ही माहिती नजीकच्या वस्तीत दिल्यावर या भूमिगत शहराबद्दल प्रशासनाला कळले होते.









