मेक्सिको माया संस्कृतीवरून जगात चर्चेचा विषय राहिला आहे. आता मेक्सिकोच्या घनदाट जंगलांमध्ये 1 हजार वर्षे जुने रहस्यमय शहर मिळाले आहे. हे शहर मेक्सिकोच्या यूकातन बेटावर आढळले असून ते जंगलामुळे आतापर्यंत अज्ञात होते. सुमारे 1 हजार वर्षांपूर्वी माया संस्कृतीचे लोक या भागाला सोडून गेले होते. युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टनच्या वैज्ञानिकांनी हवाई पाहणीदरम्यान या शहराचा शोध लावला आहे.

या शोधाचे नेतृत्व सहाय्यक प्राध्यापक जुआन कार्लोस यांनी केले आहे. यादरम्यान एलआयडीएआर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, जेणेकरून घनदाट जंगल अन् उंच वाढलेल्या गवतांदरम्यान लपलेल्या अवशेषांचा शोध लावता येईल. या सर्वेक्षणादरम्यान नष्ट झालेल्या संस्कृतीचे अनेक अवशेष आढळून आले आहेत. पुरातत्व तज्ञांनी यानंतर या भागाचे मे-जून महिन्यात सर्वेक्षण केले आणि या पुरातत्व स्थळाला ओकोमटून नाव दिले. त्यांना 50 फूट उंचीची पिरॅमिडसदृश वास्तू आढळून आली आहे. याचबरोबर पुरातात्विक महत्त्वाच्या गोष्टी आढळल्या आहेत. हे सर्व अवशेष 600 सालापासून 900 सालाच्या आसपासचे असल्याचे मानले जाते. हा काळ माया संस्कृतीचा काळ मानला जातो. आम्ही सर्वेक्षणाची छायाचित्रे पाहिल्यावर तेथे अत्यंत आकर्षक अशा गोष्टी असल्याचे लक्षात आले. परंतु प्रत्यक्षात खरा शोध तेथे उत्खनन केल्यावर लागला. एलआयडीएआर तंत्रज्ञानाद्वारे या अवशेषांचे स्थान कुठे हे समजले. यानंतर वैज्ञानिकांना त्या ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत करावी लागली असे प्राध्यापक कार्लोस यांनी सांगितले आहे.
वैज्ञानिकांना वाटेत येणाऱ्या वृक्षांना तोडावे लागले, गवत हटवावे लागले आणि त्यानंतर त्यांना हे शहर दृष्टीपथास पडले. आम्ही जंगलात विशाल इमारती पाहिल्या. माया संस्कृती पिरॅमिड मंदिरे आणि दगडांनी तयार केलेल्या वास्तूंसाठी ओळखली जाते. ही संस्कृती दक्षिण मेक्सिको, ग्वाटेमाला, बेलीज, होंडुरास आणि एल साल्वाडोरपर्यंत फैलावलेली होती. या अवशेषांमध्ये बाजारपेठसदृश रचना असून त्या अत्यंत हैराण करणाऱ्या असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.









