सुधाकर काशीद,कोल्हापूर
वाळू, वीट ,सिमेंट नाही. लोखंड नाही. लाकडाचा मर्यादीत वापर, आणी बांधकामासाठी फक्त आणी फक्त दगड चुन्याचा वापर अशी प्राचिन वास्तु शिल्प कलेशी नाळ जोडणारे एक मंदिर खाटांगळे (तालुका करवीर) येथे उभे राहत आहे. या गावाचे दैवत विठलाई देवी.सर्वांच्या श्रद्धा या देवीशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे मंदिरासाठी देणगी म्हणून प्रत्येकाकडून दगड, मंदिराच्या बांधकामात प्रत्येक गल्लीचे आळीपाळीने श्रमदान ,आणि गावाची एकजूट या भक्कम पायावर वास्तुशिल्पशैलीचा पारंपारिक आविष्कार असणारे हे पहिले मंदिर आकाराला येत आहे.
संपूर्ण दगड आणि चुन्यातले बांधकाम, पारंपारिक धाटणीचे मंदिराचे खांब, त्यावरील कलाकुसर हे आधुनिक काळात आता आव्हानच असले तरी पारंपारिक शैलीतच मंदिराची रचना करायची हा खाटांगळे गावकऱ्यांचा संकल्प आहे. निसर्गाचीही साथ अशी की, खाटांगळे परिसरात अकरा, बारा फूट उंचीचे अखंड दगड ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. ज्याच्या जागेत, ज्याच्या शेतात असे दगड आहेत ते ग्रामस्थ मंदिरासाठी हे दगडच दान म्हणून देत आहेत. हे दगड कापणे ,घडवणे त्याला ठराविक कोनात आकार देणे यासाठी एक दीड एकरात वर्कशॉपच सुरू केले गेले आहे. दगड घडवणाऱ्या पाथरवटांची जुनी नवी पिढी या कामात गुंतली आहे. आधुनिक व्यवहारात आता फक्त उंबऱ्यासाठी दगड वापरतात. व बाकी काम सिमेंट काँक्रीटमध्ये हे ठरुन गेले आहे. पण या गावात मंदिराच्या पहिल्या पायरीपासून ते शिखरावरच्या गोळ्यापर्यंत फक्त दगडच वापरला जाणार आहे.
खाटांगळे गाव सांगरूळपासून दोन किलोमीटरवर आहे.गावात शेती हा सर्वांचा पारंपारिक आधार.याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात गावाची चांगलीच आघाडी आहे.गावातील अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या स्थानावर आहेत.
राजकीय दृष्ट्याही गाव ताकदवान आहे.त्यामुळे गाव तसेच सधन समाधानी आणि सामाजिक धार्मिक परंपरा श्रद्धेने जपत आले आहे.
गावात विठ्ठलाईचे पुरातन मंदिर आहे मंदिर जुन्या धाटणीचे होते.पण काळानुसार बदल करणे आवश्यक होते.त्यासाठी गावकरी एकत्र आले.आर्किटेक्ट संतोष रामाने यांनी मंदिराचे बांधकाम फक्त दगडातच करावे अशी सूचना केली. त्यामुळे दगडाची उपलब्धता ,दगडी बांधकामाचा खर्च, दगडी बांधकाम करणारे कारागीर हा पहिलाच थोडा अडचणीचा मुद्दा उपस्थित झाला. पण जसजशी चर्चा होत राहिली तसतसा मार्ग निघत गेला.गावाच्या परिसरातलाच दगड मंदिरासाठी वापरायचे ठरले व दगडाचा मोठा खर्च कमी झाला.लोक आपापल्या जागेतील शेतातील दगड मंदिरासाठी आणून देऊ लागले. एक दगड तर 29 टन वजनाचा मिळाला. योगायोगाने पाथरवट कारागिर मिळाले. गावालगतच एका जागेत दगड कापणाऱ्या मशीनचे चक्र एका लयीत फिरू लागले.
आता मंदिराचा पहिला मजला बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे.दगडी खांब, भिंती, दगडी झरोके, दगडी कमानी यामुळे मंदिराच्या कामाची झलक दिसू लागली आहे.हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ म्हणून न राहता ध्यान धारणा केंद्र ,भजन कीर्तन, उपासना, सामाजिक ,आरोग्य विषयक मार्गदर्शन या सर्व उपक्रमासाठी उपयोगी पडेल अशी त्याची रचना आहे. मंदिरातले वायुविजन हे पारंपारिक झरोका तंत्रावर करण्यात आले आहे.अख्खे गाव व मंदिर समिती त्यासाठी झटत आहे. मंदिराच्या उभारणीत कुठे फाटा फुटायला नको म्हणून ग्रामपंचायतची निवडणुकी गावकऱ्यांनी बिनविरोध केली आहे. मंदिरासाठी गावातल्या सर्व घटकांचा समावेश असलेली एक समिती बनवण्यात आली आहे. आणि गाव करेल ते राव करेल काय या उक्तीची प्रचिती या मंदिराच्या निमित्ताने हे गाव सर्वांना देत आहे.
निसर्गाशी जवळिक…
दगडी बांधकाम शैलीत अनेक नैसर्गिक मुद्दे दडलेले आहेत. मंदिर हे जरूर धार्मिक स्थळ आहे. पण पारंपारिक मंदिराची रचना मनशांती देणारी आहे. दगडी वास्तुतला गारवा खूप शितल असतो. हिवाळ्यात हाच दगड उबदारपणा देतो. दगड हा पूर्ण निसर्गाचा घटक आहे. हे मंदिर बांधताना सिमेंट, विटा, वाळू ,लोखंड, ग्रॅनाईट हे टाळले आहे. त्यामुळे या मंदिरात येणारी अनुभूती एक वेगळीच असणार आहे. खाटांगळे ग्रामस्थांनी मंदिर उभारणीत जणू स्वत:ला झोकुनच दिले आहे.
संतोष रामाने, आर्किटेक्ट
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









