उझैर खानसह सहा दहशतवाद्यांना कंठस्नान, पाच सैनिक हुतात्मा
वृत्तसंस्था / श्रीनगर
सात दिवस चाललेली अनंतनाग येथील चकमक संपल्याची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागातील वनक्षेत्रात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी झालेल्या या चकमकीत उझैर खान हा दहशतवाद्यांचा म्होरक्या मंगळवारी टिपला गेला. गेल्या सात दिवसांमध्ये एकंदर सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मात्र, राष्ट्रकर्तव्य करताना तीन अधिकारी आणि एक सैनिकही हुतात्मा झाले आहेत.
मंगळवारी ठार झालेला दहशतवादी उझैर खान हा लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेचा हस्तक होता. तो मूळचा काश्मीरमधील असला तरी त्याला पाकिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण मिळाले होते. तो 2022 पासून आपल्या घरातून बेपत्ता झालेला आहे. त्यानंतर त्याने दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले. तो इतर दहशतवाद्यांसह अनंतनाग येथील घनदाट वनांमध्ये लपल्याची माहिती गुप्तचरांनी दिल्याने भारतीय सेनेच्या काही तुकड्यांनी वन पिंजून काढण्यास प्रारंभ केला,
प्रदीर्घ चकमक
अनंतनाग येथील चकमक गेल्या 10 वर्षांमधील चकमकींमधील सर्वात प्रदीर्घ काळ चालेली चकमक मानण्यात येत आहे. ती संपल्याचे घोषित करण्यात आले असले तरी या क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांना वनांमध्ये न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या भागात अद्यापही एखादा दहशतवादी लपला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील हालचालींवर लक्ष ठेवले आहे.
उझैरचा मृतदेह ताब्यात
10 लाख रुपयांचे इनाम असणारा उझैर खान याचा मृतदेह आणि त्याच्याकडील शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्या मृतदेहासह आणखी एक मृतदेह आढळला आहे. तो कोणाचा आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. तो आणखी एक दहशतवादी आहे की सामान्य नागरीक आहे, हे पडताळले जात आहे. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणखी काही जागा सापडल्या असून त्या नष्ट करण्यात येणार आहेत. एकंदर हे अभियान यशस्वी झाले असून मोठ्या प्रमाणावर जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे कारस्थान हाणून पाडण्यात आले आहे.
जळलेला मृतदेह सापडला
दहशतवाद्यांना शोधताना सैनिकांना एक जळलेला मृतदेहही आढळला आहे. त्याचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या चकमक संपली असली तरी देखरेख केली जात असून दहशतवाद्यांच्या आणखी हालचाली दिसून आल्यास पुन्हा हल्ला करण्यासाठी सैनिक सज्ज आहेत, अशी माहिती सेनेकडून आणि प्रशासनाकडून देण्यात आली.
तीन अधिकारी, सैनिक हुतात्मा
दहशतवाद्यांशी दोन हात करताना राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर अनील डोनचाक आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक हुमायुन भट यांना वीरगती प्राप्त झाली आहे. तसेच एक सैनिकही हुतात्मा झाला. एक सैनिक दोन दिवस बेपत्ता होता. तो मंगळवारी सापडल्याचे घोषित करण्यात आले. अनंतनाग आणि बारामुल्लाच्या वनक्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
घुसखोरीचा प्रयत्न उध्वस्त
- गुप्तचरांची माहिती आणि सेनेच्या तत्परतेने घुसखोरीचा प्रयत्न विफल
- उझैर खानला टिपल्यामुळे दहशतवादी संघटनांना बसला मोठा हादरा
- अद्यापही अनंतनाग वनक्षेत्रावर सेनेच्या तुकड्यांकडून बारकाईने लक्ष
- पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांना हुसकून लावण्यासाठी सेना सज्ज









