बेळगाव : अनंतपूर (ता. अथणी) गावच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व्हे क्रमांकामध्ये जवळपास 30 कुटुंबीय वास्तव्यास आहेत. अनेक दिवसांपासून सदर कुटुंबीयांना रहदारीसाठी रस्ता निर्माण करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सध्या अग्रणी ओढ्याला पाणी आल्यामुळे येथील नागरिकांचा रहदारीचा रस्ता बंद झाला आहे. याची त्वरित दखल घेवून सोय करून देण्यात यावी, अशी मागणी अनंतपूर ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अनंतपूर ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व्हे क्रमांक 237, 238, 239, 240 यामध्ये अनेक कुटुंबीये घरे बांधून चंद्रप्पावाडी येथे वास्तव्य करत आहेत. या नागरिकांना ये-जा करण्यासाठी अग्रणी ओढा पार करून जावा लागतो. येथेच असणाऱ्या सर्व्हे क्रमांक 241 व अजूर ग्राम पंचायत व्याप्तीत येणाऱ्या सर्व्हे क्रमांक 14 मधील जमीन रस्ता सोडण्यास मालकांकडून तक्रार करण्यात येत आहे. यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्याअभावी ऊसवाहतूक अशक्य
सध्या महाराष्ट्रातून पाणी सोडल्यामुळे अग्रणी ओढा तुडुंब भरला आहे. ओढ्याच्या काठाने असणाऱ्या जमिनीवर आसपासच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने रस्त्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेला ये-जा करणेही कठीण झाले आहे. ओढ्याला पाणी आल्याने रस्ता बंद होवून गेल्या आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांना घरीच बसावे लागत आहे. तसेच सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू असून रस्त्याअभावी ऊस वाहतूक करणे अशक्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची तत्काळ दखल घेवून नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्त्याची सोय करून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.









