कार्लसन दुसऱया स्थानी विराजमान, उर्वरित चार फेऱयांमध्ये चुरस अपेक्षित
स्टॅव्हेन्जर-नॉर्वे / वृत्तसंस्था
भारताचा अनुभवी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद पुन्हा एकदा विजयपथावर पोहोचला असून सोमवारी त्याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. क्लासिकल सेक्शनमध्ये सध्या या स्पर्धेत पाचवी फेरी सुरु आहे. आनंद या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाला.
यापूर्वी ब्लित्झ इव्हेंटमध्येही नॉर्वेचा सुपरस्टार कार्लसनला नमवणाऱया आनंदने तीच मालिका क्लासिक इव्हेंटमध्ये देखील कायम राखली. उभयतातील प्रारंभिक लढत 40 चालीत बरोबरीत राहिल्यानंतर येथे आर्मागेडॉनचा (सडनडेथ गेम) अवलंब केला गेला. आर्मागेडॉन लढतीत 52 वर्षीय आनंदने कार्लसनला 50 चालीत शरणागती पत्करणे भाग पाडत आपल्या प्रतिभासंपन्न खेळाच्या इतिहासाची छोटीशी चुणूक दाखवून दिली.
या स्पर्धेत आणखी 4 फेऱया बाकी असून भारतीय ग्रँडमास्टर आनंद 10 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. आनंदने क्लासिकल इव्हेंटमध्ये सलग 3 विजयासह उत्तम सुरुवात केली. त्याने लॅग्राव्हे (फ्रान्स), व्हॅसेलिन टोपालोव्ह (बल्गेरिया) व हाओ वांग (चीन) यांना सलग लढतीत नमवले. मात्र, अमेरिकेच्या वेस्ले सो याने चौथ्या फेरीत त्याची ही विजयी मालिका खंडित केली. तूर्तास, कार्लसनला आनंदविरुद्ध पराभव पत्करावा लागला असला तरी 9.5 गुणांसह तो दुसऱया स्थानी विराजमान आहे.
यापूर्वी ब्लित्झ सेक्शन जिंकणारा वेस्ले सो अझरबैजानच्या शखरियार मेमेद्यारोव्हविरुद्ध 8.5 गुणांसह संयुक्त तिसऱया स्थानी विराजमान आहे. पाचव्या फेरीत सो याला मेमेद्यारोव्हविरुद्ध आर्मागेडॉन लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. अनिश गिरी (नेदरलँड्स), नॉर्वेचा आर्यन तारी यांनी पाचव्या फेरीत अनुक्रमे तैमूर रॅझबोव्ह (अझरबैजान) व हाओ वांग (चीन) यांचा पराभव केला. प्रेंचमन मॅक्झिमे लॅग्राव्हेने अन्य एका लढतीत अनुभवी व्हॅसेलिन टोपालोव्हविरुद्ध सडनडेथ गेम जिंकत 7 गुणांवर झेप घेतली. या स्पर्धेतील क्लासिकल गेम बरोबरीत राहिला तर आर्मागेडॉनचा (सडनडेथ) अवलंब केला जातो.