आनंद पुजारीस न्यायालयीन कोठडी
चिपळूण : काही दिवसांपूर्वी शहर बाजारपेठेत अन्न व औषध प्रशासनाने बेकायदा गुटखा साठ्यावर केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणी पोलिसांनी गुटखा सप्लायर किंगमेकर आनंद पुजारीला अटक केली आहे. त्यास 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आता पोलीस यातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत. पुजारी याच्याकडे अद्याप कोणताही गुटखा आढळून आलेला नाही. दरम्यान, पुजारीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई व रत्नागिरी अन्न-औषध प्रशासनाच्या पथकाने शहर बाजारपेठेतील रुमानी चेंबर येथे सिध्देश सचिन खेराडे याचा 3 लाख 46 हजार 479 रूपये तसेच रंगोबा साबळे मार्गावरील नजराणा अपार्टमेंट येथून शहनवाज मुस्ताक कच्छी, मुस्ताक झिकर अब्दुल गणी कच्छी, समीर अयुब शेख यांच्याकडील 1 लाख 475 रुपये किंमतीचा बेकायदा गुटखा साठा जप्त केला होता. या कारवाईनंतर गुटखा कोण सप्लाय करतो, याचा पोलीस शोध घेत असतानाच शहरातील खेंड येथील आनंद नागाप्पा पुजारी याचे नाव पुढे येताच या गुटखा सप्लायरला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेत अटक केली. त्यास शुकवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हे ही वाचा : बँक खाते हॅक करून ९२ लाखावर डल्ला मारणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
आनंद पुजारी याला अटक केल्यानंतर पोलीस आता गुटखा मुख्य सप्लायरचा शोध घेत असून त्या दिशेने त्यांनी तपास सुरु केला आहे. असे असले तरी आनंद पुजारीने गुटखा खरेदी-विक्री कोणकोणत्या ठिकाणापर्यंत आहे, तो गुटखा सप्लाय हजारोत करतो की लाखात, याची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. तसे पाहिल्यास आनंद पुजारी हा कांदा, बटाटा व्यावसायिक असला तरी त्याचे गुटखा सप्लायर्सचे नेटवर्क सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांना मुख्य गुटखा सप्लायरचा शोध लागल्यास या गुटखा खरेदी-विक्रीचे नेटवर्क कुठून कुठपर्यंत आहे, यात आणखी किती मोठे सप्लायर आहेत, याचा निश्चित उलगडा होणार आहे.









