स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील भारताचा पहिला चॅम्पियन, एकूण 3 पदके
वृत्तसंस्था/ बीजिंग, चीन
भारताचा स्केटर आनंदकुमार वेलकुमारने नवा इतिहास रचताना स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून दिले. या 22 वर्षीय स्केटरने वरिष्ठ पुरुषांच्या 1000 मी. स्प्रिंटमध्ये 1:24.924 अशी वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले. याच स्पर्धेत बीडायहे येथे झालेल्या 500 मी. स्प्रिंटमध्ये 43.072 से. वेळ नोंदवत कांस्यपदक मिळविले होते. या वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळालेले हे पहिले पदक होते. यासह भारताला ज्युनियर विभागातही यश मिळाले. युवा स्केटर क्रिश शर्माने 1000 मी. स्प्रिंटमध्ये सुवर्ण मिळविले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आनंदकुमारचे त्याने मिळविलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन केले. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा अत्यंत वैभवशाली क्षण असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तो या प्रकारात सुवर्ण मिळविणारा पहिला भारतीय स्केटर असून तुझा आम्हाला अभिमान वाटतो, असेही त्यांनी म्हटले आहे.









