वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑक्टोबरमध्ये सेंट लुईस, अमेरिका येथे होण्राया क्लच बुद्धिबळ प्रदर्शनीय सामन्यांमध्ये भारताचा महान खेळाडू विश्वनाथन आनंद रशियाचा दिग्गज बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हसोबतची आपली स्पर्धा पुन्हा जागृत करेल, तर विश्वविजेता डी. गुकेश परिचित प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसनविऊद्ध खेळेल.
कास्पारोव्ह आणि आनंद यांच्यात शेवटचा सामना 2021 मध्ये झाग्रेब येथे झालेल्या क्रोएशिया रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेत झाला होता, जिथे भारतीय खेळाडू विजयी झाला होता. त्यांच्या शानदार कारकिर्दीत या दोघांमध्ये सर्व प्रकारांत 82 वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये कास्पारोव्ह सर्व प्रकारांत आघाडीवर राहिलेला आहे आणि 30 सामने अनिर्णित राहिले आहेत.
दोन माजी विश्वविजेते गॅरी कास्पारोव्ह आणि विश्वनाथन आनंद 7 ते 11 ऑक्टोबरदरम्यान एका खास क्लच बुद्धिबळ प्रदर्शनीय सामन्यात आमनेसामने येतील. हा सामना दोन बुद्धिबळ दिग्गजांचा वारसा साजरा करेल, असे सेंट लुईस बुद्धिबळ क्लबने म्हटले आहे. हा प्रदर्शनीय सामना म्हणजे क्लबच्या सुधारित सुविधेत आयोजित केलेला पहिला कार्यक्रम असेल आणि तो अमेरिकेची बुद्धिबळ राजधानी आणि या खेळातील जागतिक प्रमुख स्थळ म्हणून शहराच्या भूमिकेची पुष्टी करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दोन दिग्गजांमधील 12 गेम्सच्या ‘चेस 960’ (फिशर रँडम) लढतीत 1,44,000 अमेरिकी डॉलर्सची बक्षीस रक्कम दिली जाईल. ही लढत जलद आणि ब्लिट्झ वेळ नियंत्रणानिशी आणि खेळाडू व चाहत्यांना मोहित करण्यासाठी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण स्कोअरिंग सिस्टमसह खेळविली जाईल. त्यानंतर काही दिवसांनी 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान त्याच ठिकाणी क्लच बुद्धिबळ चॅम्पियन्स शोडाउन होईल. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला कार्लसन, दुसऱ्या क्रमांकावरील हिकारू नाकामुरा, तिसऱ्या क्रमांकावरील फॅबियानो काऊआना आणि गुकेश यांचा समावेश असेल. रोजच्या विजयासाठी बोनस आणि चॅम्पियन्स जॅकपॉटसह 4,12,000 अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे या स्पर्धेत ठेवण्यात आली आहेत..









