वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव्ह आज बुधवारपासून येथे होणाऱ्या ‘क्लच चेस : द लिजंड्स’ स्पर्धेत 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांच्यातील तीव्र स्पर्धेला उजाळा देतील. 12 सामन्यांच्या या ‘चेस 960’ पद्धतीच्या लढतीसाठी एकूण 1 लाख 44 हजार अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे ठेवण्यात आली असून सुधारित सेंट लुईस चेस क्लबमध्ये ही लढत आयोजित केली जाईल.
1995 मध्ये न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 107 व्या मजल्यावर क्लासिकल पद्धतीच्या जागतिक स्पर्धेतील सामना ते खेळले होते. त्यानंतर खेळातील हे दोन्ही दिग्गज पुन्हा एकदा अशा स्वरुपात लढतील, ज्याला अलीकडेच फ्रीस्टाइल चेस असे नाव देण्यात आले आहे. कास्पारोव्हने आनंदविऊद्धच्या त्या सामन्यात वर्चस्व गाजवले आणि 20 सामन्यांची स्पर्धा 10.5-7.5 ने जिंकली.
2004 मध्ये निवृत्त झाल्यानंतर कास्पारोव्ह फक्त प्रदर्शनीय किंवा ब्लिट्झ स्पर्धांमध्ये खेळला आहे, तर आनंद पूर्णपणे निवृत्त झालेला नाही आणि कधी कधी उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये खेळतो. कास्पारोव्ह त्याच्या नावाने जागतिक स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम चालवतो, तर आनंदने स्वत:ला तरुण भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करण्यापुरते मर्यादित ठेवले आहे आणि ‘वाका वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमी’मागचा तो मुख्य प्रेरणास्थान आहे. या अकादमीने आधीच डी. गुकेशसारखा एक विश्वविजेता दिलेला आहे.
ताज्या लढतीचे स्वरूप रंजक असून रोज रंगत वाढत जाईल. तीन दिवसांच्या स्पर्धेत दररोज चार सामने असतील, ज्यामध्ये दोन रॅपिड आणि दोन ब्लिट्झ सामने असतील. पहिल्या दिवशी चार गुण पणाला लागतील, तर दुसऱ्या दिवशी ते दुप्पट होतील. कारण प्रत्येक विजयाचे मूल्य दोन गुण असेल आणि तिसऱ्या दिवशी प्रत्येक विजयासाठी तीन गुण मिळतील. विजेत्याला 70000 डॉलर्स (अंदाजे 62 लाख ऊपये) मिळतील, तर पराभूत होणाऱ्या खेळाडूसाठी 50000 डॉलर्स (अंदाजे 44 लाख ऊपये) राखीव ठेवण्यात आले आहेत.









