हनुमान चषक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित हनुमान चषक 14 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमी बीएससी बी. संघाचा, युनियन जिमखाना अ ने एसकेई क्रिकेट अकादमीचा, बीएससी अ ने प्रमोद पालेकर अकादमीचा तर युनियन जिमखाना ब ने एमसीसी मच्छेचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. सिद्धांत नेसरीकर, महम्मद हमजा, समर्थ गवळी, आदित्य हुंबरवाडी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिनडेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बीएससी ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 135 धावा केल्या. त्यात आयुष आजगावकरने 56, समर्थ हंगरगेने 36 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे सिद्धांत नेसरीकरने 15 धावांत 3, ऋषभ नाईकने 19 धावांत 3 तर पज्ञातने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 17.2 षटकात 1 गडी बाद 136 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. अरुश देसूरकरने 43, अद्वैत चव्हाणने 42 तर अमर पटवेगारने 20 धावा केल्या. बीएससीतर्फे अथर्व बाळेकुंद्रीने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात एसकेई अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात सर्वगडी बाद 87 धावा केल्या. त्यात अद्वैत भट्टने 34 तर देवन व दक्ष यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. जिमाखानातर्फे अथर्व भोगन व स्वराज्य हुलगी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना 12.4 षकटात 2 गडी बाद 91 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात महम्मद हमजाने नाबाद 50, अतिथ भोगणने 22 तर कौस्तुभ पाटीलने 14 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात बीएससी अ ने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 209 धावा केल्या. त्यात सचिन तलवारने 52, इम्तियाज मंडळने 44, लक्ष खतायतने 44, दर्श रायकरने 23 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रमोद पालेकर अकादमीचा डाव 17.2 षटकात 50 धावांत आटोपला. बीएससीतर्फे समर्थ गवळीने 3 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात जिमखाना अ ने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात 2 गडी बाद 232 धावा केल्या. त्यात आदित्य हुंबरवाडीने 121 धावा करत स्पर्धेतील पहिले शतक झळकविले. त्याला सलमान धारवाडकरने 52 धावा करुन सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसीने 22 षटकात 9 गडी बाद 87 धावा जमविल्या. अकिब कलादगीने 20 धावा केल्या. जिमखानातर्फे सलमान धारवाडकर आणि गवळी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.