वृत्तसंस्था/ झाग्रेब
‘ग्रँड चेस टूर’चा भाग असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेच्या ब्लिट्झ विभागात भारतीय खेळाडू विश्वनाथन आनंद आणि युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश यांच्या वाट्याला पहिल्याच दिवशी घसरण आली. आनंदला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागून त्याला नऊपैकी फक्त दोन सामने जिंकता आले. यात गुकेशविऊद्धचा एक सामनाही समाविष्ट राहिला.
ब्लिट्झच्या नऊ फेऱ्यांनंतर आनंदची गुणसंख्या 13 वर पोहोचली असून यानंतर आणखी नऊ फेऱ्या तो खेळणार आहे. पाच वेळच्या या विश्वविजेत्याचा दुसरा विजय फॅबियानो काऊआनाविऊद्ध नोंदला गेला. दुसरीकडे, गुकेशने रिचर्ड रॅपोर्टविऊद्ध (रोमानिया) विजयाने सुऊवात केल्यानंतर त्याला सलग चार पराभव स्वीकारावे लागले. त्यानंतर त्याने कॉन्स्टेन्टिन लुपुलेस्कू (रोमानिया) आणि जॅन-क्रिझिस्टोफ डुडा (पोलंड) यांच्यावर विजय मिळवून पुनरागमन केले. तथापि, इव्हान सारिक (क्रोएशिया) आणि इयान नेपोम्नियाची यांच्याकडून पराभूत व्हावे लागल्याने शेवट खराब झाला.
आनंद आणि गुकेश 13 गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला मॅग्नस कार्लसन मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला. त्याने सर्व नऊ सामने जिंकून महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. त्याचे 20 गुण झालेले असून रविवारी ब्लिट्झ विभागाचा उत्तरार्ध खेळविला जाणार आहे. शनिवारी आघाडीवर राहिलेला नेपोम्नियाची आणि काऊआना यांना संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर राहावे लागलेले आहे. 18 फेऱ्यांची ही ब्लिट्झ विभागातील स्पर्धा रॅपिड विभागातील स्पर्धेनंतर खेळविण्यात येत आहे. यात विजयासाठी एक गुण, तर बरोबरीसाठी अर्धा गुण दिला जात आहे.









