एएमआय, सुनील नाईक यांची आगेकूच : सुरेश गडकरी चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित सुरेश गडकरी चषक 11 वर्षाखालील आंतरकॅम्प क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनादिवशी आनंद क्रिकेट अकादमी संघाने निनाचा 10 गड्यांनी, बेळगाव स्पोर्ट्स क्लबने टिळकवाडी अकादमीचा 1 धावाने, एआयएम क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाने आरसीसी गोवा संघाचा 8 गड्यांनी तर सुनील नाईक क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाने श्री दुर्गा स्पोर्ट्स क्लब संघाचा 52 धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली. एस. भिसे, प्रसाद नाईक, समर्थ पी. व अथर्व करडी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भुतरामहट्टी येथील भगवान महावीर जैन स्कूलच्या टर्फ मैदानावर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते सुरेश गडकरी, दर्शन गडकरी, प्रमोद पालेकर, माजीद मकानदार, आनंद करडी, नागेश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन व खेळाडूंची ओळख करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या सामन्यात निना संघाने 20 षटकात 4 बाद 104 धावा केल्या. झोया काझीने 6 चौकारांसह 43, किशन पिसेने 5 चौकारांसह 33 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे अथर्व करडी व आरुष देसूरकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 11.2 षटकात बिनबाद 105 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. अथर्व करडीने 7 चौकारांसह नाबाद 44 तर अद्वैत चव्हाणने 5 चौकारांसह नाबाद 34 धावा केल्या.
दुसऱ्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 20 षटकात 9 बाद 102 धावा केल्या. दर्शने 5 चौकारांसह 29 धावा केल्या. टिळकवाडी अकादमीतर्फे अखिल तेलीने 3 तर कब्बारने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडी अकादमीने 20 षटकात 8 बाद 101 धावाच केल्या. पवनकुमारने 2 चौकारांसह 17 तर जी. व्ही. विशेषने 14 धाव केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे समर्थ पी. ने 3, तनिष्क वेर्णेकर व अल्तमश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
तिसऱ्या सामन्यात आरसीसी गोवा संघाने 20 षटकात 8 बाद 96 धावा केल्या. नारायण के. ने 21 तर काविश पी. ने 18 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे अगस्त, दिग्विजय व फरान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एआयएम सावंतवाडीने 17 षटकात 2 बाद 97 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. प्रसाद नाईकने 6 चौकारांसह 44 धावा केल्या. गोवातर्फे संदिपने 1 गडी बाद केला. चौथ्या सामन्यात सुनील नाईक अकादमी सावंतवाडी संघाने 20 षटकात 5 बाद 175 धावा केल्या. सयानने 42, श्रेयसने 29 तर आदित्यने नाबाद 23 धावा केल्या. श्री दुर्गा स्पोर्ट्स क्लबतर्फे मंजु व अभिषेक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्री दुर्गा स्पोर्ट्स क्लब संघाने 20 षटकात 8 बाद 123 धावा केल्या.









