साईराज चषक 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी
बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक 12 वर्षांखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमीने सीसीआय संघाचा 1 गडय़ाने तर रॉजर क्रिकेट अकादमीने बीएससी बी संघाचा 73 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अथर्व करडी व अथर्व बेळगावकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सीसीआय संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 74 धावा केल्या. त्यात वेदांत बिज्जलने 16, कलश बेनीकट्टीने 15, योग शहाने 10 धावा केल्या. आनंदतर्फे अथर्व करडीने 13 धावात 2, स्वराज्य जुवेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 22.1 षटकात 9 गडीबाद 75 धावा करून सामना 1 गडय़ाने जिंकला. त्यात अथर्व करडीने 3 चौकारांसह 23 तर अमोघ हिरेमठने 10 धावा केल्या. सीसीआयतर्फे कलश बेनीकट्टीने 18 धावात 4 तर विराज पाटील व योग शहा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात रॉजर क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 124 धावा केल्या. त्यात रजत संभाजीचेने 22, नमन बडवाण्णाचे 13, संकेत नाकाडीने 11 धावा केल्या. बीएससी बीतर्फे आरुष कुंदपने 2 तर ओम आजरेकर, वेदांत कामत, समर्थ तलवार व सुजल गोरल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएससी बी संघाचा डाव 12.1 षटकात 51 धावात आटोपला. त्यांचा एकही फलंदाज रॉजरच्या गोलंदाजीपुढे दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. रॉजरतर्फे अथर्व बेळगावकरने 5 धावात 4 तर रजत संभाजीचे, संकेत नाकाडी, अजय काट्राल, ऋतुराज जाधव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









