क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून तेजल शिरगुप्पी अकादमीने विजया क्रिकेट अकादमीचा 7 गड्यांनी, हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने टॅलेन्ट स्पोर्ट्स क्लब अ हुबळीचा तर आनंद क्रिकेट अकादमीने हुबळी स्पोर्ट्स क्लब सी चा 7 गड्यांनी पराभव करत प्रत्येक 3 गुण मिळविले.
बेळगाव येथील केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यामध्ये विजया क्रिकेट अकादमीने 43.3 षटकात सर्व बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना तेजल शिरगुप्पी संघाने 20.1 षटकात 3 बाद 140 धावा करुन सामना 40 धावांनी जिंकला. आदित्य उदपाने 51, प्रल्हाद नाईके 40 तर साईनाथ राजगोळीने 29 धावा केल्या. हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात टॅलेन्ट स्पोर्ट्स क्लब अ हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 30.5 षटकात सर्व गडी बाद 103 धावा केल्या. त्यात रवीकुमार एस. ने 31, श्रवण व अजरुद्दीन यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. हुबळी क्रिकेट अकादमीतर्फे कुणाल आर. व विकास दोडमणी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने 25.3 षटकात 2 बाद 105 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब सी संघाने 33.3 षटकात सर्व बाद 177 धावा केल्या. आदित्यने 36, समर्थने 30, साईकुमारने 29 धावा केल्या. आनंदतर्फे अक्षय पाटीलने 4 तर समर्थने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमीने 34.3 षटकात 3 बाद 178 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. कामिल बॉम्बेवालेने 61, तेजसने 45, ज्ञानेशने 28 धावा केल्या. हुबळीतर्फे समर्थने 1 गडी बाद केला.









