वृत्तसंस्था/ डेलियान (चीन)
रविवारी येथे झालेल्या 30 व्या आशियाई कनिष्ठांच्या वैयक्तिक स्क्वॅश स्पर्धेत भारताची स्क्वॅशपटू अनाहत सिंगने मुलींच्या 17 वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. सदर स्पर्धा 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान घेतली गेली. दिल्लीची 15 वर्षीय अनाहत सिंगने अंतिम लढतीत हाँगकाँगच्या इना केवांगचा 3-1 अशा गेम्समध्ये पराभव केला.
या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अनाहत सिंगने मलेशियाच्या लीचा तर त्यानंतर उपांत्य सामन्यात तिने मलेशियाच्या व्हिटेनी विल्सनचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. आशियाई कनिष्ठांच्या स्क्वॅश स्पर्धेत अनाहतचे हे दुसरे तर सर्वंकष तिसरे पदक आहे. 2022 साली थायलंडमध्ये झालेल्या आशियाई कनिष्ठांच्या स्क्वॅश स्पर्धेत 15 वर्षीय अनाहत सिंगने पहिले सुवर्णपदक मिळविले.