वृत्तसंस्था / बेगा (ऑस्ट्रेलिया)
येथे सुरू असलेल्या विश्व एनएसडब्ल्यूच्या बेगा खुल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत भारताची महिला स्क्वॅशपटू 17 वर्षीय अनहात सिंगने आपल्या दुखापतीवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
महिलांच्या गटातील झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इजिप्तच्या अव्वल नूर खाफग्येचा 3-2 (10-12, 11-5, 11-5, 10-12, 11-7) अशा गेम्स्मध्ये 54 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात अनहात सिंगला तिसरा गेम सुरू असताना हाताला दुखापत झाली होती. पण या दुखापतीकडे तिने दुर्लक्ष करत विजय हस्तगत केला. या विभागीय आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा अनहात सिंग ही पहिली भारतीय स्क्वॅशपटू आहे. अनहात सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरीचे कांस्यपदक मिळविले होते. आता अंतिम फेरीत अनहात सिंगची लढत इजिप्तच्या हबीबा राणीशी होणार आहे. हबीबा राणीने उपांत्य फेरीच्या लढतीत भारताच्या पाचव्या मानांकीत आकांक्षा साळुंखेचे आव्हान 3-1 (11-9, 7-11, 12-10, 11-6) असे 42 मिनिटांत संपुष्टात आणले. सदर स्पर्धेसाठी एकूण 25 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.









