वृत्तसंस्था/ शिकागो, अमेरिका
वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणारे भारताचे युवा स्क्वॅशपटू अनाहत सिंग व अभय सिंग यांनी विजयी सुरुवात केली.
17 वर्षीय अनाहत सिंगने जागतिक क्रमवारीत 28 व्या स्थानावर असणाऱ्या अमेरिकेच्या मेरिना स्टेफानोनीला पराभवाचा धक्का दिला. 62 व्या मानांकित अनाहतने मेरिनावर 10-12, 11-9, 6-11, 11-6, 11-6 अशी मात करीत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. पहिला व तिसरा गेम गमविला असला तरी तिने दुसरा, चौथा व पाचवा गेम जिंकत आगेकूच केली. दुसऱ्या फेरीत तिची लढत जागतिक 15 व्या मानांकित फैरोझ अबोएल्खीरशी होईल. इजिप्तच्या फैरोझने आपल्याच देशाच्या हाना मोअताझचा 3-1 असा पराभव केला.
पुरुष एकेरीत भारताच्या अभय सिंगनेही विजयी प्रारंभ केला. जागतिक 25 व्या मानांकित निकोलस म्युलरचे आव्हान त्याने संपुष्टात आणले. 38 वे मानांकन असलेल्या अभयने स्विसच्या म्युलरवर 11-7, 2-11, 11-7, 11-6 अशी मात केली. दुसऱ्या फेरीत त्याची लढत जागतिक 13 व्या मानांकित इजिप्तच्या युसेफ इब्राहिशी होणार आहे.









