सिव्हिल हॉस्पिटलचा भोंगळ कारभार : पालकांना नाहक मन:स्ताप
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलकडून अनगोळ गावाच्या नावातच बदल करण्याचा प्रकार समोर आला आहे. जन्मदाखल्यात अनगोळ ऐवजी इंग्रजीमध्ये ‘अनगोळा’ असा उल्लेख केल्याने पालकांना दुरुस्तीसाठी नाहक पळापळ करावी लागत आहे. एका चुकीच्या उल्लेखामुळे पालकांना कोर्टामधून अॅफिडेव्हिट करण्याची वेळ येत असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाकडून यापूर्वीही बेळगावमधील अनेक गावांचा चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. मध्यंतरी वडगाव ऐवजी ‘वडगावी’ असे फलक आरोग्य विभागाकडून लावले होते. सरकारदरबारी वडगाव असा उल्लेख असतानाही वडगावी असा उल्लेख का केला? असा जाब विचारल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. असाच प्रकार आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होत आहे. कॉम्प्युटरमध्ये अनगोळ ऐवजी ‘अनगोळा’ असा इंग्रजीत उल्लेख केल्याने प्रत्येक जन्मदाखल्यावर अशीच नोंद होत आहे.
महापालिकेत मात्र अनगोळ
जन्म-मृत्यू दाखल्यासाठी सर्वत्र एकच यंत्रणा आहे. परंतु, महापालिकेमध्ये जन्मदाखला काढल्यानंतर त्यामध्ये अनगोळ असा उल्लेख होतो. परंतु, सिव्हिल हॉस्पिटलमध्येच ‘अनगोळा’ असा उल्लेख का होत आहे? असा प्रश्न पालकांनी व्यक्त केला.









