पणजी : साधारणत: योगासने ही घरात किंवा मोठ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी करताना अनेकजणांनी पाहिली असतील. परंतु पाण्यात योगासने करताना गोव्यात कुणी पाहिली असेल किंवा केली असेल यात शंका आहे. अशाप्रकाराची पाण्यातील अद्भूत आणि अभूतपूर्व योगासनाचा प्रयोग जलयोग प्रशिक्षण केंद्रातर्फे नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराच्या प्रांगणात करण्यात आला. जलजीव तरंगावे तसे पाण्यावर सहज तरंगत सर्व देव दिशा नमस्कार, ताडासन, भद्रासन, पद्मासन नमस्कार, उत्तानमंडूकासन, मत्स्यासन, यासारखी विविध योगासने गोमंतकीय जलयोग शिष्यांनी पाण्यावर अगदी लिलाया करून दाखविली.
एवढेच नव्हे पाण्यावर अशोकचक्र, रामसेतू, केरला बोट, आगगाडी अशी दर्शकांना आकर्षित करणारी दृश्येदेखील ही त्यांनी पाण्यावर सहज साकारली. ‘जलयोग’ संकल्पना ही नाविन्यपूर्ण व अद्भूत वाटली तरी सनातन वैदिक परंपरेतील एक विद्या असून प्रत्येकाजवळ ही विद्या असणे आवश्यक आहे. पाण्याच्या ठिकाणी होणारे असंख्य अपघात टाळण्यासाठी का होईना प्रत्येक माणसाने जलयोगाचे धडे गिरविलेच पाहिजे असे मत जलयोग गुरू हरीश नवाथे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पतंजलीचे प्रभारी कमलेश बांदेकर, गिरीश परूळेकर, विश्वासजी शेट कोरगावकर, कमलाकांत तारी, सप्तकोटेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष आनंद सरदेसाई, सौ. संध्या, विद्याधर करबोधकर, तरूण भारतचे संपादक सागर जावडेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील पळ उपस्थित होते.
अशाप्रकारचा सोहळा पणजी शहरात होणे फार आवश्यक आहे. जेणेकरून गोव्याच्या कानाकोपऱ्यात जलयोग पोहचविणे सहज शक्य होईल असे सागर जावडेकर यांनी व्यक्त केले. जलयोग गुरू श्री नवाथे यांना 14 वर्षीय एस.पी.शशांक (कर्नाटक), ज्येष्ठ नागरिक गंगाधरजी (कर्नाटक) यांनी गोमंतकीयांना जलयोग शिकविण्यासाठी विशेष सहकार्य केले. जलयोगबद्दल असलेले त्यांचे प्रेम, निष्ठा व समर्पण वाखाणण्यासारखे आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी, रविवारी येऊन त्यांनी पाच वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून ते 80 वर्षांच्या विद्यार्थ्यांपर्यंत जलयोगाचे प्रशिक्षण दिले. पहाटे सहा ते नऊ पर्यंत तसेच संध्याकाळी चार ते साडेसहा पर्यंत त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या शिष्यांनग जलयोगाचे प्रशिक्षण दिले.
पतंजली योग समितीच्या साहाय्याने नवाथे यांनी गोव्यात ‘गोमंतक जलयोग महासंघ’ याची स्थापना केली. शिवाय ‘देवनवाथे जलयोग प्रशिक्षण केंद्राचीसुद्धा स्थापना केली आहे. या केंद्रांतर्गत ते गोव्याच्या दोन जलाशयांवर जलयोग प्रशिक्षण देतात. विशेष म्हणजे या सोहळ्यास कर्नाटकातून त्यांचे जलयोग शिष्य प्रदर्शन करण्यासाठी आले होते. त्यांनीही आपले कर्तब दाखविले. विशेष कर पोहण्याचे विविध प्रकार त्यांनी सहज दाखविले. याप्रसंगी जलयोगगुऊ श्री नवाथे, श्री गंगाधर व कुमार एस पी शशांक यांचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जलयोगाचे कर्तब दाखविणाऱ्या सर्व शिष्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. जलयोग प्रशिक्षण देण्याच्या योजनेस मूर्त रूप देण्यासाठी श्री सप्तकोटेश्वर देवस्थान नार्वे ग्रामस्थ, मये गावचे पंच-सरपंच, मये गोशाळेचे अध्यक्ष कमलाकांत तारी तसेच तुळशीदास मंगेशकर यांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप पूजा मंगेशकर यांनी आभार व्यक्त करून केला तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी अभिषेकी ,सत्यमजी व शर्मिलाजी यांनी केले.









