७ लाख ६९ हजार रुपये दागिन्यांसह ५० हजाराची रोकड लंपास
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील पुरळ कोंडाबा पुजारेवाडी येथील सुरेश आत्माराम जाधव यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून घरातील रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. घरातील ५० हजाराच्या रोकडसह सुमारे ७ लाख ६९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा सुमारे ८ लाख १९ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना २८ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० वा. ते १ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास घडली असून दाखल फिर्यादीनुसार विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ कणकवली तालुक्यातील शिवडाव जाधववाडी येथील सुरेश जाधव यांचे पुरळ कोंडाबा पुजारेवाडी येथे घर आहे. सुरेश जाधव हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचे पत्नी सौ. सुनीता असे दोघे तेथे राहतात. त्यांचा मुलगा आत्माराम हा नोकरीनिमित्त पुणे येथे कुटुंबासमवेत वास्तव्यास आहे. २८ जुलै रोजी दुपारी ३ वा. च्या सुमारास सुरेश जाधव हे पत्नीसमवेत त्यांच्या मूळ गावी शिवडाव येथे नागपंचमी सणाकरिता गेले होते. दरम्यान, १ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास सुरेश जाधव यांच्या मेव्हुणीचा मुलगा कुणाल चव्हाण याच्यासमवेत सुनीता जाधव या दुचाकीने पुरळ कोंडाबा पुजारेवाडी येथील आपल्या घरी परतल्या. यावेळी त्यांनी घराचा मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता त्यांना घराचा मागील दरवाजा आड केलेल्या स्थितीत दिसला. तसेच त्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटलेल्या स्थितीत दिसून आला. कुणाल याने याची माहिती तात्काळ सुरेश जाधव यांना दिली. त्यानंतर सुरेश जाधव हे त्यांचे साडू प्रभाकर चव्हाण यांच्यासमवेत शिवडाव येथून पुरळ कोंडाबा येथे आले. त्यांनी घरातील साहित्याची पाहणी केली असता घरातील सामान अस्थवस्थ पडलेले दिसून आले. जाधव यांनी या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांच्यामार्फत विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली. घटनेची माहिती मिळताच विजयदुर्गचे पोलीस निरीक्षक संजय कातिवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, पोलीस हवालदार प्रशांत जाधव, विक्रम कोयंडे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच विजयदुर्ग पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. या घटनेच्या तपासासाठी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनेची फिर्याद सुरेश जाधव यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









