आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशङखला ।
यया बद्धाः प्राधावन्ती मुक्तास्ति÷न्ती पङ्गुवत् ।।
अर्थः आशा नांवाच्या विचित्र साखळीने बांधलेला मनुष्य इथे-तिथे धावत असतो, आणि या साखळीतून बंधमुक्त झालेला मनुष्य मात्र शांत-स्थिर असतो!
हे सुभाषित वाचलं आणि मी स्वतःचच परीक्षण करायला लागले. आशा, ओढ, इच्छा किंवा ईर्षा, सतत मोठं बनायची घाई, आपल्याला कुठे घेऊन धावत असते हे कळत नाही. पण ती सगळं स्वास्थ्य घालवून बसते हे मात्र नक्की. जगातील प्रत्येक गोष्ट मलाच मिळाली पाहिजे ही बांधिलकी संपली तरंच मन धावायचे थांबेल. आणि असे बंधमुक्त मन आणि माणसं शांत आणि स्थिर होतील. नाही तर झोपेतसुद्धा विचारांबरोबर धावणारी माणसं आपलं सुख, आपली झोप आणि आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचं जगणं सगळं अस्वस्थ करून टाकत असतात. स्वतःसाठी मात्र दुखण्याला आमंत्रण देतात.
खरंतर प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. त्या प्रत्येक गोष्टीला, फुलायला पिकायला, रुजायला, तेवढा वेळ द्यायलाच हवा असतो. परंतु माणसं मात्र प्रत्येक गोष्ट तातडीने ताबडतोब मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. एखाद्या ऋतूत येणारं फळ आपल्याला भलत्या ऋतूत हवं असेल तर त्यासाठी आपण रासायनिक द्रव्य वापरून ते पिकवतोसुद्धा किंवा रुजवतोसुद्धा. एखादे लहान मूल बोबडे बोलत असेल तर त्याला आम्ही अट्टाहासाने इंग्रजी शिकवायला जातो, संस्कृत शिकवायला जातो आणि त्याच्याकडून त्याचं लहानपणा जणू काढून घेत असतो. बरेचदा एखादं मुल सातव्या महिन्यात जन्माला आले असं हे ऐकतो पण तो त्याच्या जन्माचा भाग असतो. खरंतर नऊ महिने पोटात राहून आपली वाढ योग्य रीतीने झाल्यानंतरच जन्माला यायचं असं देवाने ठरवलेलं असतं परंतु आपल्या प्रकृतीनुसार किंवा आपल्या घाईनुसार आपले जन्म पुढे मागे होत असतात. पोटातच एखादी कला शिकता येते हे महाभारताच्या कथेमध्ये वाचलेले असते. असे अनेक अभिमन्यू आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात. पण अशी माणसं अवकाळी पडलेला पाऊस, थंडी किंवा इतर ऋतूंप्रमाणे आत्मघातकी ठरतात. आपल्या मुलाला सगळं आलं पाहिजे, असा अट्टाहास करणारे पालक खूप लहानपणापासून त्याला सगळय़ा क्लासेसना पाठवतात. सगळय़ा कलागुणांना मिळवता येईल असं बघत असतात. त्याला ते आवडतेय का? येतंय का? किंवा रुचतंय का? या गोष्टीचा विचारसुद्धा करत नाही अशावेळी अनेकांचे लहानपण केव्हाच निसटून गेलेले असते. आमच्या शिक्षणामध्ये मनाला वळण देणारं शिक्षण आम्हाला मिळणे गरजेचे आहे. त्यामध्ये मनावर नियंत्रण करणाऱया अनेक कथा गोष्टी आम्हाला सांगायला हव्यात.
क्रमशः








