ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तिहार तुरुंगामधून देशवासियांच्या नावे पत्र लिहून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान कमी शिक्षित असणे देशासाठी धोकादायक आहे. मोदींना शिक्षणाचे महत्त्व समजत नाही, त्यांनी गेल्या काही वर्षात देशातील 60,000 शाळा बंद केल्या आहेत, असा उल्लेख या पत्रात आहे. या पत्रावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मनीष सिसोदिया यांनी तिहारच्या तुरुंगातून देशवासियांच्या नावे पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये पंतप्रधानांचे शिक्षण कमी असणे हे देशासाठी खूपच घातक आहे. मोदींना विज्ञान कळत नाहीत. मोदींना शिक्षणाचे महत्व कळत नाही. गेल्या काही वर्षात 60,000 शाळा त्यांनी बंद केल्या आहेत. त्यामुळे भारताच्या विकासासाठी पंतप्रधानांचं उच्चशिक्षित असणे गरजेचे आहे”, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सिसोदियांचे पत्रही त्या ट्विटसोबत जोडले आहे.
सिसोदियांनी पत्रात काय म्हटले आहे?
21 व्या शतकात आपण जगत आहोत. प्रत्येक दिवशी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये अपडेट होताना दिसते. संपूर्ण जग आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची चर्चा करत आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी म्हणतात, नाल्याच्या पाईपमधील गॅसचा वापर करता यायला हवा, ढगांच्या पलिकडील विमान रडारवर दिसत नाही, तेव्हा ते हस्यास्पद होते. शाळा-कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांची खिल्ली उडवतात. त्यांची अशा प्रकारची विधाने देशासाठी घातक आहेत. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. यामुळे जगाला कळतं की भारताच्या पंतप्रधानांचे शिक्षण किती कमी आहे. पंतप्रधान कमी शिक्षित असणे देशासाठी धोकादायक आहे. मोदींना शिक्षणाचे महत्त्व समजत नाही, त्यांनी गेल्या काही वर्षांत देशभरातील 60,000 शाळा बंद केल्या आहेत.









