दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा उपक्रम
ओटवणे प्रतिनिधी
दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागाच्यावतीने गड किल्ल्याच्या संवर्धनासह सामाजिक बांधिलकीच्या भावनेने दरवर्षी शैक्षणिक व सामाजिक उपक्रमही राबविले जातात. यावर्षीही या प्रतिष्ठानने सेवाभावी व्यक्तींच्या सहकार्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘एक छत्री गरजू विद्यार्थ्यासाठी’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
जून महिन्यापासून शाळा सुरू झाल्यानंतर पालक आपल्या पाल्यांना जमेल तसे शैक्षणिक साहित्य खरेदी करून शाळेत पाठवत असतात. ग्रामीण भागातील अनेक पालकांना आजच्या महागाईमध्ये आर्थिक परिस्थिती अभावी आपल्या पाल्यांना दरवर्षी छत्री देणे परवडत नाही. त्यात ग्रामीण व दुर्गम भागातील दुकानांमध्ये छत्र्या मिळतातच असे नाही. अशा परिस्थितीत छत्री नसल्याने अशा विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत येताना आणि जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशा गरजु व गरीब विद्यार्थ्यांना छत्री उपलब्ध करून देण्याचा संकल्प दुर्ग मावळा प्रतिष्ठानने केलेला आहे.
प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमातून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या मदतीने शोध घेऊन त्यांना सेवाभावी व्यक्तींच्या माध्यमातून छत्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या ‘एक छत्री गरजू विद्यार्थ्यासाठी’ या उपक्रमात गरजू विद्यार्थी शोधण्यासाठी तसेच या उपक्रमात एक छत्री देऊन सहभागी होण्यासाठी दानशूर व सेवाभावी व्यक्तीनी ९८६०२५२८२५ आणि ९४२२२६३८०२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.









