मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : नेशन फर्स्ट पॉलिसी सेंटरसोबत करार,राज्यात मिशन कर्मचारी मोहीम राबविणार
प्रतिनिधी /पणजी
गोवा सरकारतर्फे नेशन फर्स्ट पॉलिसी रिसर्च सेंटर सोबत समन्वय करार करण्यात आला असून तो 14 महिने कालावधीसाठी मर्यादित आहे. त्या करारातून राज्य सरकारच्या प्रगतीचे अवलोकन करण्यात येणार असून भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची कार्यवाही करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी करारावेळी दिली.
केंद्र सरकारच्या विविध योजनांची गोव्यात अंमलबजावणी व्हावी म्हणून सेंटरसोबत संशोधन केले जाणार आहे. या कराराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत गोवा सरकार पोहोचण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य मिळणार असल्याचे ते म्हणाले.
‘मिशन कर्मचारी’ राबविणार
या कराराअंतर्गत ‘मिशन कर्मचारी’ मोहीम राबवण्यात येणार असून सरकारी अधिकाऱयांना कर्मचारी म्हणून काम करावे लागणार आहे. तसेच सरकारला येणाऱया अडचणी यावर मंत्री, सचिव, अधिकारीवर्ग याकरीता चिंतन शिबिर घेण्यात येऊन समस्या सोडवल्या जाणार असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला.
सेंटर करणार त्रुटी दूर
पर्वरी येथील सचिवालय सभागृहात या कराराचा कार्यक्रम झाला. त्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते. करारानंतर बोलताना डॉ. सावंत पुढे म्हणाले की, सरकारच्या खातेनिहाय प्रगतीचा आढावा सेंटर घेणार असून खात्यांतर्गत असलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पंतप्रधानांनी स्पष्ट केली धोरणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य सचिवांची तसेच मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीय स्तरावर परिषद घेऊन केंद्राची धोरणे स्पष्ट केली आहेत आणि ती कार्यवाहित आणण्याची सूचना केली आहे. मुख्य सचिव परिषदेची माहिती मुख्य सचिव इतर सचिवांना देतील तर मुख्यमंत्री परिषदेची माहिती आपण स्वतः इतर मंत्र्यांना देणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
मोहिमेसाठी अधिकाऱयांना प्रशिक्षण
‘मिशन कर्मचारी’ मोहिमेसाठी सरकारी अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यात येणार असून केंद्राच्या विविध धोरणांची मदत गोवा सरकारसाठी होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. नियोजन सांख्यिकी खात्याने विजय सक्सेना व सेंटरचे उदय गोडा यांनी करारावर स्वाक्षऱया केल्या.









