कन्नड-संस्कृती खात्याच्या संचालकांची संगोळ्ळीला भेट
बेळगाव : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कन्नड व संस्कृती खात्याच्या संचालिका डॉ. के. धरणीदेवी मालगत्ती यांनी शुक्रवारी संगोळ्ळीला भेट देऊन तयारीची पाहणी केली. 17 व 18 जानेवारी रोजी हा उत्सव होणार आहे. बेळगाव येथे संगोळ्ळी रायण्णा वीरज्योतीचे स्वागत केल्यानंतर धरणीदेवी यांनी संगोळ्ळीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत कन्नड व संस्कृती खात्याचे सहसंचालक के. एच. चन्नूर, उपसंचालिका विद्यावती बजंत्री आदी उपस्थित होते.संगोळ्ळी उत्सवासाठी राज्य सरकारने दीड कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे धरणीदेवी यांनी सांगितले. उत्सवासाठी गावातील शाळेजवळ भव्य मंडप उभारण्यात येत आहे. या कामाची त्यांनी पाहणी केली. उत्सवात भाग घेणाऱ्या लोकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. संगोळ्ळी येथे उभारण्यात आलेल्या शिल्पग्रामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या शिल्पग्रामात संगोळ्ळी रायण्णा यांचे देशप्रेम, शौर्य, जीवनचरित्र दर्शविणारी शिल्पे आहेत. तरुणपिढीसाठी शिल्पग्राम प्रेरणादायी ठरणार आहे, असेही धरणीदेवी यांनी सांगितले.









