सध्या लग्नसराईचा काळ आहे. त्यामुळे आपल्याकडे आपल्या परिचितांच्या लग्नपत्रिका येत असतात. त्यांच्यापैकी काही पत्रिका अतिशय कल्पक असतात. लग्नसमारंभ झाल्यानंतरही त्या संग्रही ठेवाव्याशा वाटाव्यात, अशी त्यांची रचना असते. विवाह सभारंभात या लग्नपत्रिकांची भूमिका मोठी असते. पत्रिकांची निवड करणे, त्यांच्यात मुद्रित करावयाच्या नावांची निवड करणे, नंतर या लग्नपत्रिकांचे मुद्रण करुन घेणे आणि त्या संबंधितांकडे पाठविणे, हे एक महत्वाचे कार्य आहे. लग्नपत्रिका पाहून आमंत्रितांमध्ये प्रसन्नताभाव निर्माण व्हावा, अशी दक्षता घेतली जाते. तथापि, प्रत्येक लग्नत्रिका अशीच असते याची शाश्वती देता येत नाही.
सध्या अशा एका लग्नपत्रिकेची चर्चा होत आहे. ही 2019 ची आहे. सर्वसाधारणपणे ‘सहकुटुंब, सहपरिवार विवाहाला येऊन वधुवरांस शुभाशीर्वाद द्यावेत’ असे वाक्य प्रत्येक लग्नपत्रिकेत असते. तथापि, या लग्नपत्रिकेत ‘ध्यान दे, सपरिवार नही आना है’ असा संदेश प्रारंभीच दिलेला वाचावयास मिळते. ही पत्रिका दीपेंद्र शुक्ला नामक व्यक्तीस पाठविण्यात आली होती. पत्रिकेवरील हा संदेश वाचून शुक्ला चांगलेच भडकले. अशा प्रकारे आमंत्रण पाठवायचे असते काय, असे प्रश्न त्यांनी पत्रिका पाठविणाऱ्याला विचारुन त्याला चांगलेच फटकारले. विवाह समारंभ हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मंगल प्रसंग असतो. अशा प्रसंगाला आपले सर्व परिचित आणि आप्तेष्ट उपस्थित असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण ही विचित्र पत्रिका एक अपवाद ठरली आहे.









