मंगेश तळवणेकर यांचे तहसिलदारांना निवेदन
ओटवणे प्रतिनिधी
आठ दिवसापूर्वी सावंतवाडी शहरात झाड पडून राहुल व समीर पंदारे या दोन तरुण मुलांच्या दुर्दैवी मृत्युच्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. यानंतर सावंतवाडी शहर व परिसरातील रस्त्यालगतची धोकादायक झाडे तोडण्याबाबत संबंधित सर्व प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास सावंतवाडी तहसिल कार्यालयावर सोमवार २३ ऑक्टोंबर रोजी जनतेसह आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.
याबाबत सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांना दिलेल्या निवेदनात मंगेश तळवणेकर म्हणतात, संबंधित प्रशासनाने झाडे तोडण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच या दोन्ही दुर्दैवी मुलांची काहीही चुक नसताना त्यांच्या बळी गेला. त्यानंतर शहर परिसरातील धोकादायक झाडे तोडण्याचे नियोजन व सर्व्हे करण्यासाठी महसूल खात्याचे लक्ष वेधले असता त्याचे पुढे काय झाले याचा पत्ताच नाही. वास्तविक लक्षवेधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, वनविभाग, महसुल विभाग व नगरपरिषद यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून याबाबतचे नियोजन करणे आवश्यक होते.
तसेच या दुर्दैवी घटनेत राहुल व समीर पंदारे या दोन्ही तरुणांचा ऐन उमेदीच्या काळात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात असलेल्या आईवडीलांसह त्यांच्या लहान भावंडांची सर्व जबाबदारी या दोघांवरच होती. शासनाने या तरुण मुलांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर करुन एक प्रकारे थट्टाच केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही युवकांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रूपये देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावा. अशी मागणी मंगेश तळवणेकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.









