विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन, वेंगुर्ले व वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे आयोजन
वेंगुर्ले(वार्ताहर)-
विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन वेंगुर्ले व सहयोगी संस्था वेंगुर्ले तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजता साई मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे ज्येष्ठ साहित्यीका वृंदा कांबळी यांच्या समग्र साहित्यावर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशनचे संस्थापक आणि “प्रसंवाद” या अनियतकालिकाचे संपादक इंजिनियर अनिल जाधव भूषविणार आहेत. तर उद्घाटक जेष्ठ समाज कार्यकर्ते आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच वेंगुर्लेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांचे हस्ते होणार आहे. यावेळी मराठीतील नामांकित कवी आणि समीक्षक वीरधवल परब, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लेचे प्राचार्य आनंद बांदेकर, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमांत साहित्यीका वृंदा कांबळी यांच्या कादंबरीवर मराठा मंदिर न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज पाली, रत्नागिरी चे प्रा. शंकर जाधव हे भाष्य करणार आहेत. कथा लेखनावर कणकवलीच्या कवयित्री, कथाकार व बालकांदबरीकार कल्पना मलये तर ललित लेखनावर गोखले कॉलेज, कोल्हापूरचे माजी प्राचार्य पी. के. पाटील आपली अभ्यासपूर्ण मते व्यक्त करतील तसेच चर्चक म्हणून विठ्ठल कदम, सीमा मराठे, पी. एस. कौलापुरे सहभागी होणार आहेत.
या चर्चा सत्राचा उद्देश एक लेखिका म्हणून वृंदा कांबळी यांचा प्रवास विविध साहित्य कृतीच्या निर्मितीतून जनमानसात होत असताना त्यांच्या जीवनाचे विविध पैलू त्यांच्या कथा, कादंबरी आणि ललित लेखनातून कसे दृढ होत जातात. त्यांचे लेखन हे समाज सुदृढ बनविण्याचे काम कशाप्रकारे करीत आहेत हे समाजापर्यंत पोहचविण्यासाठी वृंदा कांबळी यांच्या समग्र साहित्यावर एक खुले चर्चासत्र हा निर्णय विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन आयोजित करण्याचा हा निर्णय वेंगुर्लेच्यावतीने घेण्यात आला आहे.तरी सर्व साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष सुनिल जाधव आणि कार्यवाह राकेश वराडकर यांनी केले आहे.