प्रतिनिधी / बेळगाव
गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी करणाऱ्या एका ऑनलाईन सेंटरवर छापा टाकून टाळे ठोकण्यात आले. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. चव्हाट गल्ली येथील जनता ऑनलाईन सेंटरवर छापा टाकण्यात आला आहे. गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी लाभार्थींकडून प्रत्येकी 250 रुपयांची मागणी करण्यात येत होती. यासंबंधी पुराव्यासहीत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती.
47 सेकंदांच्या व्हिडिओ पुराव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना तपासणीची सूचना केली होती. महिला व बाल कल्याण खाते, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांनी गुरुवारी चव्हाट गल्ली येथील अदृश्य आर. टी. यांच्या मालकीच्या जनता ऑनलाईन सेंटरवर छापा टाकून तपासणी केली. या सेंटरमध्ये किरण चौगुला यांच्या मुतगा ग्रामवन सेंटरचा लॉगईन आयडी वापरण्यात येत होता, असे आढळून आले आहे. ग्रामवन लॉगईन आयडीचा वापर करून ऑनलाईन नोंदणी केली जात होती. लाभार्थींकडून 250 रुपये वसूल करण्यात येत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनता ऑनलाईन सेंटरला टाळे ठोकले आहेत.









