साडय़ा वाटपाच्या कार्यक्रम सुरू असल्याचे सांगून केली दिशाभूल
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील सदाशिव पेठेत रविवारी भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करंजे येथील मोळाचा ओढा येथे राहत असलेल्या वृद्ध महिलेला दोन अनोळखी इसमांनी थांबविले. पुढे साडय़ा वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. असे सांगून जबरदस्ती दुकानातील एका जिन्यावर बसण्यास सांगितले. तोच यातील एकाने अंगावरील सोने काढून बॅगेत ठेवा असे म्हणत दुसऱयाने हातोहात ही बॅगेतील पर्स लंपास करून दोघेही निघून गेले. काही वेळाने वृद्धेने बॅगेत पर्स आहे का याची खात्री केली. परंतु पर्स त्यामध्ये नव्हती. ही पर्स याच इसमांनी चोरून नेल्याचे लक्षात येताच वृद्धेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सौ. अरुणा रामचंद्र शिंगटे (वय 70) असे त्यांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अरूणा शिंगटे या कामानिमित्त सदाशिव पेठेत गेल्या होत्या. यावेळी दोन इसमांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. यातील एकाने त्यांना पुढे साडय़ा वाटप सुरू आहे. मोठी लोकं येणार आहेत. तुम्ही त्यांना नमस्कार करा असे सांगितले. तोच शेजारी असणाऱया जिन्यावर बसवले. यातील एकाने गळ्यातील सोन्याचे दीड तोळ्याचे 75 हजार रुपये किंमतीचे गंठण, 20 हजार रुपये किंमतीची 4 ग्रॅम वजनाची अंगठी हे बॅगेत ठेवण्यात सांगितले. वृद्धेने गंठण, अंगठी काढून पर्समध्ये ठेवले. तोपर्यंत यातील एकाने ही पर्स लंपास करून दोघेही निघून गेले. काही वेळाने महिलेने रस्त्यावर येऊन पाहिले तर कोणी दिसले नाही. तिने परत बॅग चेक केली. यावेळी बॅगेत ठेवलेली पर्स नव्हती. ही पर्स या दोन इसमांनी नेली. यांची खात्री होताच अरुणा घाबरल्या. त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार भोसले करत आहेत.
वृद्धांना लुटण्याच्या घटनेत सातात्याने वाढच
गेल्या काही दिवसापासून शहरात वृद्धांना पोलीस आहे असे सांगून लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. शहर पोलीस ठाण्यात गुन्हे ही दाखल झालेत तरीही चोरटे अद्याप मोकाट आहेत. पोलिसांकडून संथगतीने तपास करण्यात येत असल्याने या चोरटय़ांना वाव मिळत आहे. तोच सदाशिव पेठेतील ही घटना वृद्धांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
वृद्धांनी काळजी घेणे झाले गरजेचे
वृद्धांना लुटण्याच्या वाढत्या घटनांना आळा बसत नाही. शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे बघ्याची भूमिका घेत आहेत. यामुळे वृद्धांनी स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान, सोन्याचे दागिने, रोख रक्कम जवळ बाळगणे टाळले पाहिजे. आपली माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका, विश्वास ठेऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षकांचे शहराकडे दुर्लक्ष
सातारा जिह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे जिह्यात खून, दरोडा, लुटमार, जबरी चोरी अशा घटना घडताच स्वतः तपासाची दिशा ठरवतात. वेळ प्रसंगी ऑन द स्पॉट जाऊन गुन्हेगारांना जेरंबद करण्यास प्रयत्न करतात. मात्र, त्यांचे पोलीस मुख्यालय हे शहरात असून हाकेच्या अंतरावर वृद्धांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. तरीही अद्याप कोणतेही धागेदोरे त्यांच्या हाती आले नाहीत. शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत असताना पोलीस अधीक्षक बन्सल हे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व संजय पंतगे यांच्या कानपिचक्या कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








