गोवावेस सर्कलमध्ये अपघाताची घटना
बेळगाव : भरधाव टँकरने ठोकरल्याने पादचारी महिला गंभीर जखमी झाली. गुरुवारी सकाळी गोवावेस सर्कलजवळ ही घटना घडली असून या अपघातात वृद्ध महिलेच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. सुरैय्या दस्तगीरसाब सय्यद (वय 79) रा. मुस्लीम गल्ली, अनगोळ असे त्या वृद्धेचे नाव आहे. चालत जात असताना भरधाव टँकरची धडक बसून ती वृद्धा गंभीर जखमी झाली. तातडीने रुग्णवाहिकेतून जखमी वृद्धेला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. सकाळच्यावेळी अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी वारंवार केली जाते. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातानंतर या मागणीला पुन्हा जोर येतो. गुरुवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. सायंकाळी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.









