तीन कामगार जागीच ठार, सहा जण जखमी : देवरशिगीहळ्ळी क्रॉसजवळ घडला अपघात
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव टँकरची टिप्परला पाठीमागून धडक बसून तीन कामगार जागीच ठार झाले तर टँकरचालकासह सहा जण जखमी झाले आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील देवरशिगीहळ्ळी क्रॉसजवळ रविवारी दुपारी ही घटना घडली असून कित्तूर पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाची कामे आटोपून घरी परतणाऱ्या कामगारांवर क्रूर काळाने घाला घातला आहे.
रामचंद्र जाधव (वय 45), त्यांचा मुलगा महेश रामचंद्र जाधव (वय 18) दोघेही राहणार गुलबर्गा, रामण्णा ऊर्फ रमेश (वय 38) राहणार शिरोळ, ता. चिंचोळी, जि. गुलबर्गा अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवींची नावे आहेत. रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. लक्ष्मीबाई (वय 28), भीमाबाई (वय 45), अनुसरी ऊर्फ अळेम्मा (वय 18), महादेव चंद्राप्पा नायकर (वय 40), श्रीनाथ सुरेश कांबळे (वय 31), टँकरचालक दिनेश शेट्टी (वय 45) अशी जखमींची नावे आहेत.
जखमी गुलबर्गा, देवलापूर, हिरेबागेवाडी येथील राहणारे असून टँकरचालक दिनेश हा मंगळूरचा आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. भीमव्वा या महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. घटनेची माहिती समजताच कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
महामार्गाची कामे करण्यासाठी गेल्या सात महिन्यांपूर्वी गुलबर्गा जिल्ह्यातील काही कुटुंबे आली आहेत. एम. के. हुबळीजवळ त्यांचे वास्तव्य आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी टिप्परमधून ते सर्व जण कामावर गेले. रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास कामे आटोपून घरी परतण्यासाठी ते टिप्परमध्ये बसले. त्यावेळी धारवाडहून बेळगावकडे येणाऱ्या केए 01 एएफ 3123 क्रमांकाच्या टँकरची टिप्परला धडक बसून टँकर सर्व्हिस रोडवर कलंडला.
टँकरची टिप्परला बसलेली धडक इतकी जबरदस्त होती की सर्व कामगार खाली फेकले गेले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रामचंद्रची पत्नी लक्ष्मीबाई हिने सांगितले, की आपण अपघातात पती व मुलगा गमावला आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी 7 वाजता आम्ही सहा जण कामावर आलो होतो. दुपारी टिप्परमधून घरी परतताना टँकरची धडक बसून माझा पती व मुलाचा मृत्यू झाला आहे. या दोघांच्या जाण्याने आपण अनाथ झाल्याचे सांगत या महिलेने आपल्या अश्रूंना वाट करून दिली.









