80 लाख रुपयामध्ये खरेदी केले विमान
छंद ही मोठी गोष्ट असल्याचे म्हटले जाते. अशाच एक छंदापोटी एका व्यक्तीने 80 लाख रुपयांचे विमान भंगारातून खरेदी करत त्यात स्वतःचे घर थाटले आहे. या ‘एअरप्लेन होम’मध्ये राहण्यासाठी वृद्ध व्यक्तीला दर महिन्याला 30 हजार रुपयांचे भाडे द्यावे लागते. पेशाने इलेक्ट्रिक इंजिनियर असलेले 73 वर्षीय ब्रूस कँपबेल यांनी बोइंग 727 जेटलायनर विमानाला घरात रुपांतरित केले आहे.
ब्रूस यांनी हे विमान 1999 मध्ये भंगारातून खरेदी केले होते. हे विमान 1066 फूट लांबीचे असून याचे वजन 32 हजार किलोग्रॅम आहे. हे विमान इकोनॉमी क्लासयुकत होते, ज्यात एकूण 200 प्रवासी आसने होती. विमानाला घरात रुपांतरित करण्यासाठी ब्रूस यांना 15 लाख रुपयांचा खर्च करावा लागला असून याकरता 2 वर्षांचा कालावधी लागला आहे.
ब्रूस यांना 30 हजार रुपयांचे भाडे द्यावे लागत असून यात विजेचे बिल आणि मालमत्ता कर सामील आहे. विमानात घराशी निगडित गरजेच्या गोष्टी म्हणजेच शॉवर, स्वयंपाकघर, मायक्रोवेव्ह ओव्हन, फ्रिज सामील आहे. हे विमान भंगारातून खरेदी केले असले तरीही याच्या अनेक गोष्टी अद्याप कार्यरत असल्याचे ब्रूस यांनी सांगितले आहे.

या विमानाचा उड्डाणासाठी अखेरचा वापर 1975 मध्ये एअरलाइनचे मालक इरिस्टोटल ओनासिस यांचे अवशेष आणण्यासाठी करण्यात आला होता. ओनासिस हे एक प्रसिद्ध उद्योजक होते, त्यांचा विवाह अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी जॅकलीन केनेडी यांच्यासोबत झाला होता. ब्रूस यांनी हे विमान खरेदी केल्यावर ते ग्रीसमधून अमेरिकेतील ओरेगन प्रांतात पोहोचले होते. त्यानंतर हे विमान हिल्सबोरो शहरातून ब्रूस यांनी नमूद केलेल्या ठिकाणी पोहोचले. तेथे विमानाचे इंजिन आणि इतर गोष्टी हटविण्यात आल्या होत्या.

का खरेदी केले विमान?
ब्रूस आता 73 वर्षांचे झाले आहेत, वयाच्या 15 व्या वर्षी टीव्हीवर एअरप्लेन बोनयार्ड पाहिले होते, तेव्हाच असे एक विमान खरेदी करण्याचा निर्धार केला होता असे ब्रूस यांनी सांगितले आहे. एअरप्लेन बोनयार्डमध्ये निवृत्त झालेल्या विमानांना ठेवले जाते. अनेकदा लोक हे विमान पाहण्यासाठी येतात. नवे लोक येथे आल्यावर त्यांना मोठा आनंद होतो, वर्षातील निम्मा वेळ अमेरिकेत तर निम्मा वेळ जपानमध्ये पत्नीसोबत राहत असल्याचे ब्रूस यांनी सांगितले.









