कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरीत भाविकांचा महासागर
पंढरपूर संतोष रणदिवे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, बबनराव पाचपुते, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, पृथ्वीराज देशमुख, सुनील कांबळे, गोपीचंद पडळकर, राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
शिरोडी खुर्द (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे हे दांपत्य मानाचे वारकरी ठरले. त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एक वर्ष कालावधीचा मोफत प्रवासाचा पास सुपूर्द करण्यात आला. श्री. साळुंखे समाज कल्याण कार्यालयातून सेवानिवृत्त झाले असून, ते पन्नास वर्षापासून वारी करत आहेत.
एकादशी सोहळा असल्याने मंदिर व मंदिरातील संपूर्ण गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेला होता. चंद्रभागा नदीत स्नान करून विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दर्शन रांगेत गर्दी केली होती.









