आज साऱ्या जगातच नोकऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. नोकरीच्या एका स्थानासाठीही हजारो अर्ज येतात. ही केवळ भारतातील परिस्थिती नाही. आर्थिकदृष्ट्या संपन्न मानल्या गेलेल्या देशांमध्येही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लोक आपले शिक्षण, आपली आवड किंवा आपली क्षमता यांचा विचार न करता मिळेल ती नोकरी करण्यास सज्ज असतात. सध्या एका अनोख्या नोकरीची जाहीरात प्रसिद्ध होते आहे. वेतन भरमक्कम आहे. पण काम विचित्र आहे.
स्कॉटलंड या प्रदेशात एक बेट आहे. ते लहान असून त्याचे नाव ‘हांडा’ असे आहे. त्याचा उपयोग समुद्रपक्ष्यांचे उपज केंद्र (सीबर्ड ब्रीडींग सेंटर) म्हणून केला जात आहे. या बेटाचे व्यवस्थापन करण्यासाठी एका व्यवस्थापकाची आवश्यकता आहे. स्कॉटीश वाईल्डलाईफ ट्रस्टने ही जाहीरात दिली आहे. नोकरी उत्तम आहे. पण स्थिती अशी आहे, की या बेटावर एकही मनुष्य वास्तव्यास नाही. व्यवस्थापकाला या बेटावर घर दिले जाणार आहे. तो आपले कुटुंब घेऊन तेथे वास्तव्य करु शकतो. तथापि, हे बेट वन्यजीव सुरक्षा केंद्र असल्याने तेथे कोणतीही आधुनिक सुविधा नाही. कपडे धुण्यासाठी देखील दूर अंतरावरच्या गावातील लाँड्रीत द्यावे लागणार आहेत. हे बेट पाहण्यासाठी प्रतिवर्ष 8 हजार पर्यटकांना अनुमती दिली जाते. त्या सर्व पर्यटकांची व्यवस्था या व्यवस्थापकाला पहावी लागणार आहे. त्याच्या हाताखाली काम करण्यास कर्मचारीवर्ग दिला जाणार आहे. मात्र, हे सर्व काम त्याला या बेटाचे खरे ‘अधिपती’ असणाऱ्या वन्य जीवांना कोणताही त्रास न होता, तसेच त्यांची जीवनशैली कोणत्याही प्रकारे बाधित न करता करावे लागणार आहे. त्यामुळेच ते अत्यंत अवघड मानले जाते असून अद्याप हे उत्तरदायित्व स्वीकारण्यास कोणी समोर आलेला दिसत नाही. कारण ही जाहिरात बरेच दिवस प्रसिद्ध केली जात आहे. या नोकरीला शैक्षणिक पात्रताही अनिवार्य नाही. सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे. या कालावधीत त्याला जवळपास 30 लाख रुपये वेतन मिळणार आहे, अशी माहिती जाहीरातीत देण्यात आलव आहे.









